नवी दिल्ली: लॉकडाऊनदरम्यान वाहतुकीची सर्व साधने बंद आहेत. डॉक्टरांपर्यंत पोहोचणेही दुरापस्त झाले आहे. अशावेळी गर्भवती महिलांची अस्वस्थता अधिक वाढीस लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ठराविक काळानंतर डॉक्टरांकडून तपासण्या आणि मार्गदर्शन घेण्यासाठी दवाखान्यांमध्ये पोहोचणेही अवघड झाले आहे. त्याबरोबर साथीच्या भीतीने घराबाहेर न पडण्याचा सल्ला सर्वच स्तरांमधून दिला जातो आहे. कुटुंबातूनही घराबाहेर न पदण्याबाबत सतर्कता बाळगली जात आहे. या अनिश्चिततेच्या काळामुळे अनेक गर्भवतींना आपल्या आणि आपल्या होणाऱ्या बाळाबद्दलची चिंता अधिक तीव्रतेने जाणवायला लागली आहे.
अनेक गर्भवती आपल्या कुटुंबीयांपासून दूरच्या शहरांमध्ये अडकल्या आहेत. त्यांना आपल्या कुटुंबीयांच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. पण प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
जन्मापूर्वी किंवा प्रसूती दरम्यान आईकडून बाळाला करोना विषाणूचा संसर्ग होणे शक्य आहे, परंतु गर्भधारणेदरम्यान झालेल्या संसर्गाचे परिणाम नवजात अर्भकावर किती प्रमाणात आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे “इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने असे म्हटले आहे.
आपल्या बाळाला करोनाची लागण होऊ नये, याचीच चिंता गर्भवतींना लागून राहिली आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी अनेक गर्भवतींनी वेगवेगळे ऍप आणि हेल्पलाईनची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. गर्भवतींना मदत करणाऱ्या वेगवेगळ्या ऍपपैकी “आयममझ’ हे एक ऍप आहे. अशा ऍपना लॉकडाऊनच्या काळात 2,500 महिलांनी लॉग इन केले आहे. अशा ऍपवरून योगा, ध्यान, घरगुती उपचार, तज्ञांचे सल्ले आणि औषधांबाबतचे मार्गदर्शन केले जाते. “आर्ममॅन’ ही अशीच मुंबईतील हेल्पलाईन आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या प्रसूति व स्त्रीरोगशास्त्र विभागाने अशा महिलांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे.