जेजुरीच्या खंडोबा देवस्थानला रशियन नागरिकांची भेट
जेजुरी – येथील महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी गडावरील खंडोबा देवस्थानास रशियन महिला पर्यटकांनी भेट देऊन जागतिक शांततेकरिता खंडोबा देवाला साकडे घातले. या पूर्वीही अनेक रशियन, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका जपानसारख्या देशातून पर्यटक येत असतात. रशियातील बहुतांशी लोक खंडोबा हे शिवशंकर अवतार असल्याने खूप मानत असतात, अशी माहिती तातीयांना कोचेतोवा या रशियन महिलेने दिली.
यावेळी ब्रात्सक सायबेरिया येथून आलेल्या एलविरा बुयानोवा व नातालीया तोलकाचोवा व मारीअण्णा यांनी खंडोबा मंदिरात सर्वाना सुखी ठेवणाऱ्या देवाचा जय जयकार असे गीत गायले. खंडोबा देवाचा भंडारा उधळणे म्हणजे आपल्या परिवाराला अन्नद मागणे आहे.
खंडोबा देवाचे दर्शन घेणे म्हणजे साक्षात शिव शंकराची पूजा करण्यासारखे आहे. खरच देवा तुझी सोन्याची जेजुरी आहे. हा देशच देवभूमी आहे. येथील संस्कार संस्कृती आम्हाला वेगळी अनुभूती देत असते, असे मारीअण्णा आबनावे यांनी यावेळी सांगितले. येथील बेचाळीस किलो वजनाची महा तलवार हातात घेऊन त्यांनी यावेळी वंदन केले.
यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त संदीप जगताप यांनी आपल्या विदेशी खंडोबा भक्तांचे स्वागत केले. यावेळी त्यांचा खंडोबा प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. विदेशी भाविकांना भावणारा आणि भारतातील सर्व लोकांचा हा देव आता पर्यटकांचा आकर्षणाचे केंद्र बनले आहे.