कारवाई करूनही अतिक्रमणे जोरात

दुसऱ्या दिवशीच परिस्थिती जैसे थे : विनापरवाना व्यावसायिकांनी पदपथ बळकावले

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. हातगाड्या, टपऱ्या व रस्त्याच्या कडेला बसलेल्या पथारीवाल्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र कारवाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच परिस्थिती जैसे थे होत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जून 2018 ते डिसेंबर अखेरपर्यंत 2,212 हातगाड्या, 949 टपऱ्या व 149 तीनचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे 10 हजार अनधिकृत फ्लेक्‍स जप्त करण्यात आले आहेत. यासोबत 12,910 इतर प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. शहर अतिक्रमणमुक्त व्हावे यासाठी अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली आहे. मात्र कारवाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच परिस्थिती जैसे थे होत आहे. कारवाई झालेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ज्या व्यावसायिकांच्या टपऱ्या अथवा हातगाड्या जप्त केल्या आहेत ते व्यावसायिक पुन्हा तेथे अतिक्रमण करुन दुकाने मांडत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक पदपथांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये सायंकाळी हातगाडी, पथारीवाले मोठ्या संख्येने ठाण मांडून असतात. पुणे- मुंबई महामार्गाच्या सेवा रस्त्याचे पदपथही बळकावण्यात आले आहेत. काही व्यावसायिकांनी पदपथांवर दुकानाचे साहित्य मांडल्याचे दिसून येते.

बेशिस्त रिक्षाचालकांकडूनही रस्त्यात रिक्षा उभ्या करण्यात येतात. पदपथ नेमके कोणासाठी असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. प्रशस्त रस्त्यांमुळे शहराची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणे अपेक्षित आहे. मात्र काही रस्त्यांचा अपवाद वगळता बहुतांश रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. नाशिक फाटा येथे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. फुगेवाडीकडून पिंपरीकडे येणाऱ्या रस्त्यावर महामेट्रोचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद झालेला आहे. त्यामध्येही जुनी वाहने खरेदी-विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. खरेदी-विक्रीसाठीची वाहने तेथे भर रस्त्यावर असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन सातत्याने कोंडी होते. खरेदी विक्रीच्या चारचाकी वाहनांमुळे पदपथ बळकावले आहेत. विनापरवाना हातगाड्या, टपऱ्या तसेच वाहने उभी करून व्यवसाय केला जातो. खाद्य पदार्थ, शोभेच्या वस्तू, सौंदर्यप्रसाधने अशा विविध वस्तूंची विक्री केली जाते.

या वस्तूंची विक्री करत असताना त्यांच्याकडून स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. अनेक खाद्यपदार्थ विक्री कऱणारे व्यावसायिक उरलेले अन्न पदपथाच्या कडेला टाकून देतात. त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरते. अशा प्रकारच्या व्यावसायिकांमध्ये वाढ झाली असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार पथके नेमून शहराच्या सर्व भागांमध्ये जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाई अंतर्गत अनेक विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र तरीही शहरामध्ये अतिक्रमणाचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यामुळे प्रशासनाने केलेली कारवाई निष्प्रभ ठरत आहे.

मागील दीड वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. ज्या तक्रारी येतात त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाते. शहरात होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तत्पर आहेत.
– शिरीष पोरेड्डी, प्रवक्ते स्थापत्य विभाग, पिं.चिं. महापालिका.

कारवाई ठरतेय केवळ देखावा
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून पदपथावरील अतिक्रमण, हातगाडीधारक यांच्यावर कारवाई होते. मात्र कारवाई झाल्यानंतर पदपथावर व रस्त्यावर भाजी विक्रेते, हातगाडीधारक पुन्हा ठाण मांडतात. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन कारवाई केवळ देखावा ठरत असल्याची परिस्थिती आहे. त्यासाठी ठोस कारवाई करणे आवश्‍यक आहे.
कारवाईपूर्वीच विक्रेत्यांना चाहुल
महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक कारवाईसाठी येते. पथकाकडून कारवाई होणार असल्याची चाहूल अतिक्रमण केलेल्या विक्रेते आणि व्यावसायिकांना मिळते. त्यामुळे पथक कारवाईसाठी दाखल होण्यापूर्वीच असे विक्रेते आणि व्यावसायिक तेथून धूम ठोकतात. पथक गेल्यानंतर विक्रेते आणि व्यावसायिक पुन्हा पदपथावर आणि रस्त्यात ठाण मांडतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.