सरकारची अवस्था दारूड्यासारखी- प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

नागपूर- सरकारने राज्यातील 25 गड-किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेने राज्यभरात मोठा गदारोळ उडाला आहे. विरोधकांसह सोशल मीडियावरही सर्वसामान्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. याच मुद्द्यावरून वंचित बहुनज आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही सरकारवर तोफ डागली आहे.

नोटाबंदी, जीएसटी यासारख्या निर्णयामुळे सरकारची संपूर्ण तिजोरी खाली झाली आहे. सध्याच्या सरकारकडे कोणतीही ध्येयधोरणे नसून त्यांची अवस्था एखाद्या दारुड्याखी झाली आहे. त्यामुळे आता त्यांनी गडकिल्ले विकायला काढले आहेत, अशी खरमरीत टीका प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात केली आहे.

आमची एमआयएमसोबत युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी नसून असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैद्राबादवरून आमच्याकडे आली आणि ते आता निरोप घेऊन ओवेसींकडे गेली आहेत. याविषयी जो पर्यंत ओवेसी काही स्पष्ट करत नाही तो पर्यंत आमची युती कायम आहे, असे असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीतून एमआयएम बाहेर पडले आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यात जागावाटपावरून मतभेद झाल्यामुळे आघाडीत फूट पडली आहे. जागावाटपाबद्दल एमआयएमचा सन्मान ठेवला गेला नाही, असे इम्तियाज जलील यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे समीकरणे बदलणार होती. पण आता एमआयएम बाहेर पडल्यामुळे पुन्हा एकदा ही समीकरणे बदलू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.