प्रज्ञावंत योगी : स्वामी विवेकानंद

मी विवेकानंद म्हटले की, बहुतेकांच्या डोळ्यासमोर भगवे कपडे घातलेले सन्याशाच्या वेषातले विवेकानंद येतात. विवेकानंदांना समजावून घेणे सोपे नाही. आपल्या संकुचित व्याख्येमध्ये बसणारा तो माणूसच नाही. ते एक बहुआयामी, प्रज्ञावंत व्यक्‍तिमत्त्व होते. विवेकानंदांचे संपूर्ण नाव नरेंद्र विश्‍वनाथबाबू दत्त. त्यांची जन्मतारीख 12 जानेवारी 1863. विवेकानंदांची शरीरयष्टी भरदार, रुबाबदार होती. संमोहित करणारे डोळे, डौलदार चाल यामुळे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व राजबिंडे दिसायचे. तरुणतरुणींचे ते आदर्श; म्हणून हा दिवस आपल्या देशात “युवादिन’ मानला जातो. इंग्रजीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. त्याचबरोबर संस्कृत भाषेचे आणि अनेक धर्मग्रंथांचे ज्ञान होते. त्यांनी शास्त्रोक्‍त संगीतावर फार मोठे प्रभुत्व प्राप्त करून घेतले होते. त्यांचा आवाज सुरेल व भरदार होता. तबला, पखवाज, इसराज आणि सतार ते उत्तम वाजवीत.

विवेकानंदांचे आयुष्य फक्‍त 39 वर्षांचे! पण इतक्‍या कमी वर्षांमध्ये त्यांनी काय केले नाही? देशविदेशात त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाने असंख्य लोक प्रभावित झाले. त्यांनी उभाआडवा सारा भारतवर्ष पिंजून काढला. या मुक्‍त भ्रमंतीत त्यांनी भारत देश समजावून घेतला. त्याचे प्रश्‍न समजावून घेतले. परदेशात गेले असता विवेकानंदांची काही प्रख्यात शास्त्रज्ञांशी भेट झाली. गप्पा मारताना विवेकानंदांना नव्या विद्युत नियमांची असलेली माहिती पाहून हे शास्त्रज्ञ अचंबित झाले. ज्ञान, माहिती मिळवण्याचे मार्ग त्या काळी अतिशय सीमित होते, हे आपण इथे लक्षात घेतले पाहिजे. विवेकानंद म्हणजे कवी, विचारवंत, कार्यकर्ता, नेता यांचे उत्तम मिश्रण होते. त्यांनी अनेक उत्तम कविता लिहिल्या. वेदातील काव्य समजावून देताना ते तल्लीन होत.

11 सप्टेंबर 1893 या दिवशी विवेकानंदांनी शिकागोमधील सर्वधर्म परिषदेत आपले ऐतिहासिक भाषण केले. त्याची संपूर्ण हकिकत जाणून घेण्यासारखी आहे. त्या पाच मिनिटांच्या भाषणामागची विवेकानंदांची अफाट मेहनत, प्रचंड जिद्द आणि सारा समाज हलवून सोडणारी प्रतिभा पाहून आपण दिपून जातो. 1893 मध्ये तेथील दुसऱ्या एका सभेत विवेकानंद म्हणाले, “तुम्ही सांगता की लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा, कारण ख्रिस्ती राष्ट्रे ही सर्वांहून जास्त भरभराटीला आलेली राष्ट्रे आहेत. पण आम्हाला दिसून येते की, जगात सर्वाहून अधिक उत्कर्षशाली असलेले इंग्लंड हे जे ख्रिस्ती राष्ट्र आहे, ते 25 कोटी आशियावासी लोकांना पायाखाली तुडवीत आहे. ही आहे संस्कृती! ही आहे सभ्यता!’
विवेकानंदांची ग्रहणशक्‍ती व स्मरणशक्‍ती असामान्य होती. एनसायक्‍लोपिडिया ब्रिटानिकाचे खंड त्यांना तोंडपाठ होते. विवेकानंदांना प्रखर बुद्धिमत्तेची देणगी लाभली होती. आधुनिक भारतातील सर्वात श्रेष्ठ तत्त्वज्ञ म्हणजे विवेकानंद होय असे म्हणून टॉलस्टॉयने त्यांची तुलना सॉक्रेटिस, प्लेटो, कान्ट या तत्त्वज्ञांशी केली आहे. त्यांची ग्रहणशक्‍ती व स्मरणशक्‍ती विलक्षण होती.

एकदा वाचलेले उतारे ते धडाधड म्हणून दाखवीत. एका पत्रात त्यांनी म्हटले आहे, “सध्या फ्रेंच शब्दकोश लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय.’ स्वतःच्या देशाच्या कल्याणाशिवाय त्यांनी दुसरा विचार केला नाही. म. गांधींच्याही आधी “भाकरीशिवाय अन्य कोणत्याही रूपात जन्म घेणाऱ्या परमेश्‍वराला हा देश सैतान समजेल’ असे ते म्हणाले होते. विवेकानंदांना वैश्‍विक प्रश्‍नांची जाण होती. त्यांची आश्‍चर्यकारक रीतीने नवी मांडणी करून त्या प्रश्‍नांची उकल संपूर्ण वेगळी, नवी उत्तरे शोधून ते करीत. कोणतेही काम केलेत तरी ते त्या वेळी उपासना समजून करा असे ते कळकळीने सांगतात. एक सच्चा ज्ञानोपासक म्हणून तिकडील वृत्तपत्रातून त्यांच्या विचारांचे कौतुक होत होते. विवेकानंदांच्या वेगळ्या विचारांनी तेथील पत्रकार व विचारवंत स्तिमित होत होते.

आज देशातील फुटिरतावाद वाढला आहे. विश्‍वासाचे वातावरण नष्ट होत आहे. विवेकानंदांना या समस्येची तीव्रता शंभर वर्षांपूर्वी जाणवली होती. ते सांगत, “विविध प्रांतांत परस्परसंवाद नाही, सांस्कृतिक देवाणघेवाण नाही. सामंजस्य तर नाहीच, उलट एकमेकांबद्दल गैरसमज आहेत. थोडा शत्रुभाव आहे. आपल्या देशाच्या आजच्या शोकांतिकेचे हे प्रमुख कारण आहे.’

हिंदू धर्मातील कर्मकांडावर त्यांचा विश्‍वास नव्हता. यज्ञ, स्मारके यावर पैसे खर्च करण्यापेक्षा दुष्काळ निवारण निधीला रक्‍कम द्यावी असे त्यांचे मत होते. जात, चमत्कार, ज्योतिष आणि गूढविद्या यावरही विवेकानंदांचा विश्‍वास नव्हता. आपल्या शिष्यांनी भौगोलिक, खगोलशास्त्रीय माहिती, रासायनिक पदार्थ, जागतिक घडामोडी याविषयीची माहिती जनसामान्यांना द्यावी असा त्यांचा आग्रह असे. 110 वर्षांपूर्वी शिक्षणामध्ये मागासवर्गीयांना आरक्षण असले पाहिजे असे मत त्यांनी मांडले होते. स्त्रियांना बरोबरीचे स्थान मिळाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. ज्या काळात “पर्यावरण’ हा शब्दही भारतात कुणी ऐकला नव्हता, त्या काळात तो विचार ते आग्रहाने मांडीत होते. हिंदू धर्मातल्या तत्त्वज्ञानाबद्दल त्यांना आदरच होता, पण विवेकानंदांना “माणूस घडविणारा धर्म’ हवा होता. धर्माने विज्ञान, वैज्ञानिक विचारपद्धती यांची मदत घेतली पाहिजे, हे सांगणारे ते पहिले “धर्मगुरू’ होत.

माधुरी तळवलकर

Leave A Reply

Your email address will not be published.