उठा, जागे व्हा !

2 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन. आज स्वामी विवेकानंद यांची 157 वी जयंती भारतात साजरी केली जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं 1984 हे वर्ष आंतरराष्ट्रीय युवक वर्ष घोषित केले होते. तेव्हापासून स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून देशभर साजरी करतात. जगाला शांततेचा संदेश देणारा हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा म्हणजेच स्वामी विवेकानंद.

कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशाच्या युवा पिढीवर अवलंबून असते. देशाच्या प्रगतीत युवक वर्गाचा मोठा हातभार लागत असतो. ऊर्जा, उत्साह, जोश, उमेद आणि सळसळता आत्मविश्‍वास ही युवा वर्गाची शक्तिस्थाने असतात. प्राप्त परिस्थितीला बदलण्याचे सामर्थ्य युवा वर्गाकडे असते; परंतु आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात याच युवकवर्गाला आपल्या शक्तीस्थानांचा विसर पडत चालल्याचे पाहायला मिळते. स्वातंत्र्य मिळून जवळपास 70हून अधिक वर्षे उलटली; परंतु देशातील अनेक समस्या अद्यापही तशाच आहेत. आज देशभरात अन्याय, अंधश्रद्धा, स्त्रियांवरील अत्याचार, जातीयता आणि इतर अनेक सामाजिक समस्या जैसे थे आहेत. या समस्यांवर मात करून देशात सामाजिक बदलाचे वारे आणण्याची ताकद फक्त युवावर्गामध्येच आहे. मात्र, आज तंत्रज्ञान आणि अज्ञानाचे गुलाम झालेल्या तरुणांना स्वतःच्या सामर्थ्याचा विसर पडत चालला आहे. अशावेळी आजच्या तरुणांना गरज आहे ती स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेल्या विचारांचा वारसदार होण्याची. कोणत्याही देशात क्रांती तेव्हाच घडते जेव्हा त्या देशातील लोकांच्या मनात विधायक विचारांची मशाल पेटते. त्यामुळे स्वामी विवेकानंद यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सांगितलेल्या खालील विचारांचे पाईक होण्यातच देशाचे सामर्थ्य दडलेले आहे.

1. स्व-जागृती व सातत्य : उठा, जागे व्हा! जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका. स्वामी विवेकानंदांचा हा विचार तरुणाईंसाठी खूप मोलाचा आहे. आजही बेजबाबदारीच्या गादीवर निश्‍चिंतपणे झोपी गेलेल्या तरुणांनी आता जागे झाले पाहिजे. स्व उन्नतीसाठी आणि राष्ट्र उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असायला हवे. यशाच्या काटेरी वाटेवरून चालताना अपयश, निराशेची तमा न बाळगता मार्गक्रमण केले पाहिजे. थांबणे हा मनुष्यप्राण्याचा स्वभावच नाही मुळी. त्यामुळे आपापल्या क्षेत्रांत भव्यदिव्य यशासाठी प्रत्येकाने तत्पर राहायला हवे.
2. अशक्‍य ते शक्‍य : स्वामी विवेकानंद म्हणतात, “शक्‍यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्‍यतेच्या पुढे निघून जायला हवे’. आपल्या हातून सहज साध्य न होणाऱ्या गोष्टींना आपण अशक्‍य हे नाव देतो; परंतु अशक्‍य हे काहीही नसते प्रयत्नांतून आणि अभ्यासाने अशक्‍यही शक्‍य करता येते. संत तुकारामांनी म्हटले आहे, अशक्‍य ते शक्‍य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे।। कारणे आणि सबब देत आपल्या प्रयत्नांना मर्यादा आणण्यात काहीही अर्थ नाही. “मी कोणतीही गोष्ट करू शकतो, अगदी ती अशक्‍य का वाटेना’ हा विश्‍वास तरुणाईने बाळगायला हवा.
3. विचारांतून विकास ः विवेकानंद मानवी विचारांना अधिक महत्त्व देत असत. विचारांबद्दल बोलताना ते म्हणतात, तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता, तुम्ही स्वतःला दुर्बल समजलात तर दुर्बल बनाल मात्र, तुम्ही स्वतःला सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल. विचार हा मानवाच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या ठरवीत असतो. मीच का? आणि मीच करू का! या दोन वाक्‍यांतून दोन विचार व्यक्त होतात. त्यामुळे विचारांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. सशक्त आणि सकारात्मक विचारसरणी प्रगतीचे लक्षण मानले जाते.
4. ध्येयवादी व्हा ः ध्येयाबद्दल स्वामी विवेकानंद म्हणतात, ध्येयासाठी जगणे, हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे. कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा. खडतर परिश्रम करा. म्हणजे तुम्ही निश्‍चित ध्येयाप्रत पोचू शकाल. ध्येयाची आखणी करण्यापासून ते ध्येयप्राप्तीपर्यंतच्या खडतर प्रवासात दुर्दम्य इच्छाशक्ती अत्यंत महत्त्वाची ठरते. स्वामी विवेकानंदानी सांगितलेला ध्येयवाद काळाची गरज आहे.
5. कामाप्रती एकनिष्ठता ः एक काम करत असताना एकच काम करा, आपले सर्वस्व त्यात अर्पण करा. इतर सारे काही विसरून जा. विवेकानंदांच्या या संदेशानुसार कामाबाबतची एकाग्रता आणि एकनिष्ठा अधोरेखित होते. चंचल व अस्थिर मनाने एकावेळी अनेक कामे केल्याने एकही परिपूर्ण होत नाही. त्यामुळे हाती घेतलेले एकच काम मोठ्या चिकाटीने पूर्ण करावे. त्यानंतरच इतर पर्यायांचा विचार करावा.

राष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्ताने युवकांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी विवेकानंदांनी सांगितलेले उपदेश आचरणात आणल्यास त्यातून नक्कीच विवेकानंदाना अपेक्षित राष्ट्र निर्माण होईल.

सागर ननावरे

Leave A Reply

Your email address will not be published.