नवी दिल्ली : नथुराम गोडसे यांचा देशभक्त असा उल्लेख केल्याबद्दल भाजपाच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या विरोधात निंदाव्यंजक ठराव मांडण्याच्या हालचाली कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीने (संपुआ) सुरू केल्या आहेत. त्यांच्या पक्षाच्या धोरणाविरूध्द खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी केलेल्या बोलघेवडेपणाला विरोध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी त्यांना पाठींबा द्यावा, असे आवाहन करण्यात येणार आहे.
द्रमुक, राष्ट्रवादी, राष्ट्रीय जनता दल आदी संपुआमधील अन्य पक्षांच्या वतीने हा ठराव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. एसपीजी सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना प्रज्ञा ठाकूर यांनी हे विधान केले होते. देशभक्त का उदाहरण नही देंगे आप, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांनी नथुरामचे नाव घेतले नव्हते. त्यांना उधमसिंह यांच्याविषयी बोलायचे होते, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.
विरोधकांनी प्रज्ञा सिंह यांचे विधान हे भाजपाच्या खऱ्या खुऱ्या द्वेषमुलक प्रवृत्तीचे द्योतक असल्याची टीका केली होती. राहूल गांधी यांनी ट्विट केले की दहशतवादी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसेचा उल्लेख देशभक्त असा केला. हा संसदेच्या इतिहासातील सर्वात दु:खद दिवस होता.
दरम्यान प्रज्ञा ठाकूर यांची संरक्षण मंत्रालय समितीच्या सल्लागार पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तसेच भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.
त्या वक्तव्याप्रकरणी भाजप प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर कारवाई करेल, असे भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले होते. यानुसार भाजपाने कारवाई करत प्रज्ञा सिंह ठाकूर यांना या समितीवरून हटविले असलायची माहिती भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिली.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काल लोकसभेत केलेले वक्तव्य निंदनिय आहे. भाजपा कधीही अशा विचारांना थारा देणार नाही. अशा वक्तव्यांचे समर्थनही करणार नाही. आम्ही संरक्षण सल्लागार समितीवरून तिला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या अधिवेशनात पक्षाच्या कोणत्याही बैठकीला तिला बोलविण्यात येणार नसल्याचे नड्डा यांनी सांगितले.