नवी दिल्ली : तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्मावर टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर देशभरात त्यांच्या विरोधात टीका करण्यात आली. दरम्यान आता पुन्हा एकदा याच मुद्दावरून मद्यप्रदेशच्या भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी उदयनीधी याना शाप दिला आहे. यासोबतच त्यांनी अभिनेते प्रकाश राज यांच्यावरही टीका केली आहे.
सनातन धर्माची तुलना एड्स, कुष्टरोग आणि मलेरियाशी करणाऱ्यांवर ठाकूर यांनी निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी सनातन धर्मविधाषयी ज्यांनी अशी टीका केली आहे, त्यांना एड्स, कुष्टरोग या रोगांची लागण व्हावी. त्यांनीच या रोगांचा उपभोग घ्यावा, असा शाप त्यांनी दिला आहे.
साध्वी प्रज्ञा यांनी अभिनेते प्रकाश राज यांच्यावर हल्लाबोल केला. ‘प्रकाश राज अभिनेते नाहीत, खलनायक आहेत. नायक नाहीत. जो धर्माच्या विरोधात, देशाच्या विरोधात बोलतो तो नायक असू शकत नाही. ज्याला आपण काय करतोय हे माहिती नाही तो खलनायक असतो. सनातन धर्माला नष्ट करण्याची औकात कोणामध्येही नाही’, असे त्या म्हणाल्या.
सनातन धर्माची तुलना डेंगु, मलेरिया, एड्सशी करणाऱ्या डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन, डी राजा आणि प्रकाश राज यांना तोच रोग व्हावा, अशी प्रज्ञा ठाकूर यांनी देवाकडे प्रार्थना केली. त्या शाप देण्याच्या अर्थाने म्हणाल्या की, ‘ज्यांनी सनातन धर्माला कुष्टरोग म्हटलं आहे, त्यांनी कुष्टरोगाचे सुख भोगावे. ज्याने सनातन धर्माला एड्स म्हटलंय त्याने एड्सचे सुख भोगावे. त्यांना अशी तुलना करायची असेल त्यांनी या रोगांचा उपभोग घ्यावा.’असेही म्हटले.