49 वर्षांपूर्वी प्रभात | येत्या दशकातील आव्हाने

ता. 11, माहे मे, सन 1972

काश्‍मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असे कबूल करेपर्यंत पाकयुद्धकैदी सोडू नका

मुंबई, ता. 10 – पाकिस्तानने काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे अशी कबुली देईपर्यंत; त्याचप्रमाणे आगामी काळात शांतता राहील अशी हमी देईपर्यंत भारताने पाकिस्तानचे युद्धकैदी सोडू नयेत, अशी मागणी माजी परराष्ट्र मंत्री एम. सी. छगला यांनी आज केली. भुट्टो यांनी “युद्ध नको’ करारावर सही केली पाहिजे, असेही छगला आग्रहाने म्हणाले.

“मला भुट्टो चांगले ठाऊक आहेत. राष्ट्रसंघात त्यांची माझी भेट झाली होती. भुट्टोच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही आणि ते पूर्णपणे बेभरवशी आहे. यामुळे भुट्टो यांनी दिलेली आश्‍वासने प्रत्यक्षात उतरल्याखेरीज मी त्यांच्यावर विश्‍वास ठेवण्यास तयार नाही. भारत-पाक शिखर परिषदेच्या वेळी म्हणूनच भारताने सावधपणे वागले पाहिजे’, असे छगला यांनी भुट्टोंबाबत आपले मत मांडले.

येत्या दशकातील आव्हाने

सातारा – राष्ट्रीयीकरणासंबंधी सर्व जगात उत्साहाचा लोंढा पसरत चालला आहे. त्यामुळे समाजवादासंबंधी ठोकळेबाज भूमिका आपण स्वीकारू नयेत. समाजवाद ही देखील गतिमान कल्पना आहे. या दृष्टीनेच पुढील दशकात व्यावहारिक भूमिकेवरून आपण विचार केला पाहिजे, असे उद्‌गार प्रा. मा. प. मंगुडकर यांनी काढले. समाजवाद, राष्ट्रवाद, कम्युनिझम, भांडवलशाही, लोकशाही या सर्वच कल्पना एखाद्या वितळणाऱ्या भांड्यात ठेवल्याप्रमाणे झालेल्या आहेत. त्यांचा आशय झपाट्याने बदलत आहे. या दृष्टीने आपण समाजवादी अर्थव्यवस्थेचा विचार केला पाहिजे.

नवा अध्यक्ष निवडीची चर्चा

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. संजीवय्या यांच्या निधनाने रिकाम्या झालेल्या जागी कोणाची निवड करावी याविषयी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. ही चर्चा प्राथमिक स्वरूपाची आहे असे कळते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.