राष्ट्रकुलातील हितसंबंध युरोपिय बाजारपेठेत सुरक्षित राखा
ओटावा, ता. 8 – ब्रिटिश राष्ट्रकूल परिषदेतील
चर्चेत आज गरीब राष्ट्रे विरुद्ध श्रीमंत गोरी राष्ट्रे असा प्रकार दिसून आला. गरीब काळ्या राष्ट्रांनी श्रीमंत राष्ट्रांना अधिक आर्थिक मदत मागितली. याबाबत सर्व सभासद राष्ट्रांत अधिक विचारविनिमय होण्याची जरूरी प्रतिपादन करण्यात आली.
बांगला देशाचे पंतप्रधान शेखसाहेब यांनी ब्रिटिश सरकारला असे सांगितले की, युरोपिय सामाजिक बाजारपेठेत ब्रिटिश राष्ट्रकुलाचे हितसंबंध सुरक्षित कसे राहतील हे पाहा. आफ्रिकन राष्ट्रांनी शेख मुजीब यांच्या म्हणण्याला पाठिंबा दिला.
भारत-सोव्हिएत कराराला दोन वर्षे झाली
नवी दिल्ली – भारत-सोव्हिएत शांतता व मैत्री करार केलेल्याला दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षांच्या काळात भारत व सोव्हिएत युनियनमध्ये राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, विज्ञान व तंत्रविषयक सहकार्य करण्यासंबंधीचे करार करण्यात आले.
भारतातील एकूण चलनापैकी निम्मे चलन केवळ शंभर रुपयांच्या नोटांचेच आहे
नवी दिल्ली – शंभर रुपयांच्या नव्या सिरीजच्या नोटा छापण्यात आलेल्या नाहीत, असे आज अर्थ खात्याचे राज्यमंत्री के. आर. गणेश यांनी लोकसभेत सांगितले. ते पुढे म्हणाले, “सध्या भारतातील एकूण जे चलन आहे त्यापैकी निम्मे चलन (पन्नास टक्के) शंभर रुपयांच्या नोटांचे आहे’.
रास्त भावात माल विका
पुणे – पुणे शहरातील प्रमुख व्यापारी आणि त्यांच्या संस्थांचे प्रतिनिधी यांच्या सभेत बोलताना जिल्हाधिकारी कांगा यांनी असे आवाहन केले की, बदलत्या काळाची गंभीररीतीने दखल घेऊन व्यापाऱ्यांनी जनतेला रास्त भावात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आगामी दोन-तीन महिने अडचणीचे आहेत. जनतेची अडचण ओळखून व्यापाऱ्यांनी मदत केली पाहिजे.