माऊली श्रीज्ञानोबारायांच्या समृद्ध ग्रंथसंपदेतील एक दर्जेदार वाङ्मयरत्न म्हणजे “चांगदेव पासष्टी’ हा ग्रंथ होय. एका महान राजयोग्याने एका महाहठयोग्याला उद्देशून केलेला हा अध्यात्मिक अनुभूतिप्रधान पत्रात्मक उपदेश आहे.
अर्थात दोन महायोग्यातील यौगिक गूढसंवादाचा हा तात्त्विक दुवा आहे. यास्तव चांगदेव पासष्टीची भाषाशैली आणि सिद्धांतपद्धती दोन्हीही (चांगदेवांच्या अधिकारानुरूप असल्याने) उच्च कोटीची असलेली दिसून येतात.
चांगदेवांनी पाठवलेल्या कोऱ्या कागदावर पासष्ट ओव्यांच्या माध्यमातून केला गेलेला हा उपदेश असल्यामुळे त्यास “चांगदेव पासष्टी’ हे नाव जरी दिले गेले असले, तरी ज्ञानोबारायांनी मात्र त्यास “स्वानंदजीवन’ या नावाने अलंकृत केले आहे, हे महत्त्वाचे.
योग, तत्त्वज्ञान, सद्गुरूकृपा आणि अद्वैतानुभूती यांच्या दुर्लभ संयोगातून साकारलेला हा सुरस आणि सुमधूर खाऊ चांगदेवांच्या नंतर आपणासही प्राप्त होत आहे, हे खरोखरच आपले महद्भाग्यच म्हणावे लागेल. यास्तव, माऊली श्रीज्ञानोबारायांच्या कृपेने या ग्रंथाचे क्रमशः विवेचन आपण दररोज पाहणार आहोत.
– चांगदेवपासष्टी तत्त्वचिंतन (भाग – 1)