मुंबई – आर्यन खान ड्रग प्रकरणातील मुख्य साक्षीदार प्रभाकर साईल यांचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. साईल यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा आर्यन खान प्रकरण चर्चेत आले आहे. दरम्यान साईल यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने साईलच्या मृत्यूमागे घातापाताची शक्यता व्यक्त करत सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान साईल यांच्या आई हिरावती व पत्नी पूजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रभाकर साईल यांची आई हिरावती साईल यांनी अचानक घडलेली घटना काही समजण्यापलीकडची आहे असे म्हणाल्या आहेत तर पत्नी पूजा साईल यांनी पतीच्या मृत्यूचा फोन आला मात्र कुणीतरी एप्रिल फुल बनवत आहे असे वाटले. असे त्यांनी सांगितले आहे.
आई हिरावती म्हणाल्या की, माझं प्रभाकरशी बोलणे झाले होते. पण हे अचानकच घडलं जे समजण्यापलीकडे आहे. मला याबाबत अधिकची काहीच माहिती नाही. हे ऐकल्यानंतर मला धक्काच बसला, मी घाबरुन गेली. त्याची तब्येत एकदम चांगली होती. असं कसं झालं काय माहीत?
पत्नी पूजा साईल यांनी सांगितले की, ते स्वत: चालत गेले. त्यांचा ECG काढला गेला. डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. मग ते चंद्रा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. त्यांना नंतर अटॅक आला आणि पाच मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीही दाखण्यात आला. त्यात सर्व दिसत आहे. आम्हाला काहीही शंका नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे, अशी माहिती पत्नी पूजा यांनी सांगितली आहे.
कोण आहे प्रभाकर साईल?
ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. या किरण गोसावीचा खासगी अंगरक्षक प्रभाकर साईल होता. एवढेच नाही तर प्रभाकर साईल एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरही आरोप केले होते. 25 करोड रुपये लाच मागितल्याचा आरोप प्रभाकर साईल यांनी वानखेडे यांच्यावर केला होता.