Earthquake in Afghanistan: अफगाणिस्तानात शनिवारी एकापाठोपाठ एक झालेल्या तीन जोरदार भूकंपांनी मोठी हानी झाली आहे. यात 15 जणांना जीव गमवावा लागला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात येत आहे.
पहिला भूकंप दुपारी 12:11 वाजता झाला, ज्याची तीव्रता 6.1 होती. काही मिनिटांनंतर, 12:19 वाजता पुन्हा 5.6 रिश्टर स्केलच्या भूकंप आणि त्यानंतर दुपारी 12:42 वाजता रिश्टर स्केलवर 6.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप नोंदवला गेला. पश्चिम अफगाणिस्तानमधील हेरात शहराच्या वायव्येस 40 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले.
अफगाण अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कालावधीत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आकडा वाढू शकतो.
आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे प्रवक्ते जनान सॅक यांनी सांगितले की, हेरातच्या “जिंदा जान” जिल्ह्यातील तीन गावांमध्ये आजच्या भूकंपात किमान 15 लोक ठार झाले आणि सुमारे 40 जण जखमी झाले. फराह आणि बादघिस प्रांतातील काही घरेही अंशत: उद्ध्वस्त झाली.
न्यूज एजन्सी ‘एपी’ने वृत्त दिले आहे की एका प्रत्यक्षदर्शीनुसार, पश्चिम अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. डब्ल्यूएचओ आणि काबुलमधील इराण दूतावास यासारख्या काही संस्थांनी भूकंपाबद्दल शोक व्यक्त केला आणि पीडितांना मदत करण्यासाठी सहकार्य करण्याची घोषणा केली.
भूकंप का होतात?
पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे. या प्लेट्स जिथे जिथे एकमेकांवर आदळतात तिथे भूकंपाचा धोका असतो. जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा भूकंप होतो. प्लेट्स एकमेकांवर घासतात, त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते आणि त्या घर्षणामुळे वरची पृथ्वी थरथरू लागते. ही ऊर्जा अधूनमधून बाहेर पडते आणि भूकंप येत राहतात, याला आफ्टरशॉक म्हणतात.