स्टार प्रवाहवर 22 फेब्रुवारीपासून भेटीला येणाऱ्या स्वाभिमान या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी पल्लवी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. याच निमित्ताने पूजा जी भूमिका साकारत आहे, त्याविषयी तिची मते तिने नुकतीच व्यक्त केली.
पल्लवी शिर्सेकर ही व्यक्तिरेखा पूजा साकारते आहे. दापोलीसारख्या छोट्याशा गावात पल्लवी आपल्या कुटुंबासोबत रहाते. अशा या सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या पल्लवीची स्वप्न मात्र मोठी आहेत. खूप शिकून प्रोफेसर होण्याचं तिचं स्वप्न आहे. तिचे निर्णय ती ठामपणे घेते. पल्लवी या व्यक्तिरेखेविषयी सांगायचं तर तिला तिच्या आईचा तिला खंबीर पाठिंबा आहे. बाबा पूर्णपणे विरोधात नाहीत. मात्र लग्नानंतरही शिक्षण घेता येतं असं त्यांचं मत आहे. त्यामुळे पल्लवी ही व्यक्तिरेखा साकारणं पूजासाठी नवं आव्हान असणार आहे.
करिअर पूर्ण करण्याच्या पल्लवीच्या या ध्येयात तिला घरच्यांची घरच्यांची साथ मिळेल की नाही हे मालिकेत कळेलच. पण अभिनय क्षेत्रात पाऊल टाकताना पूजाला तिच्या घरच्यांचा पाठिंबा मिळाला होता का? यावर पूजा सांगते की, माझ्या घरातून मला पूर्णपणे पाठिंबा आहे. माझं शिक्षण कॉम्प्युटर सायन्समधून घेतलं आहे. पण अभिनयाची आवड असल्यामुळे मी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं. मी माझ्या आई-बाबांना जेव्हा याविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत मला या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचं बळ दिलं.
मालिकेच्या प्रोमोजना मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल पूजा सांगते की, प्रोमोजला खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. प्रोमोमध्ये समुद्र किनाऱ्यावर मी सायकल चालवली आहे. मला माझ्या बाबांनी लहानपणी सायकल चालवायला शिकवली होती. त्याचा उपयोग मला मालिकेसाठी झाला. खूप छान अनुभव होता. मालिकेत कलाकारांची तगडी स्टारकास्ट आहे. फ्रेम्स प्रोडक्शन्स सारखं उत्तम प्रोडक्शन हाऊस हा सुवर्णयोग जुळून आला आहे. “स्वाभिमान’ मालिकेतला पूजाचा लूकही खूप छान आहे. प्रत्येक कलाकाराचं ड्रीमरोलचं एक स्वप्न असतं. पूजासाठी पल्लवी ही व्यक्तिरेखा म्हणजे माझा ड्रीमरोलच आहे.