निवडणूक यंत्रणा सज्ज : पोलिसांचा कडक बंदोबस्त
वाघोली – वाघोली परिसरामध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान निर्भय, मुक्त, पारदर्शी आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय निवडणूक यंत्रणा व लोणीकंद पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मतदारांना अडचण येऊ नये व मतदान केंद्रात पाणी येऊ नये म्हणून सर्व केंद्र “वॉटरप्रूफ’ केली गेली आहेत. जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.
शिरूर विधानसभा निवडणुकीसाठी वाघोलीतील मतदार मतदानासाठी सज्ज झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणा देखील मतदारराजाच्या सोयीसाठी तयार आहे. वाघोलीतील 35 मतदान केंद्रावर सुमारे 37643 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांच्या सोयीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील आपआपली यंत्रणा उभारली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा संवेदनशील मतदान केंद्रावर राज्य राखीव पोलीस दल, स्थानिक पोलीस, होमगार्डच्या मदतीने विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 150 पोलीस अधिकारी व कर्मचारी चोख बंदोबस्तासाठी तैनात असणार असल्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले.
तात्पुरती दोन मतदान केंद्रे उभारली –
वाघोलीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन मतदान केंद्रे वाढली असल्यामुळे निवडणुक आयोगाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या शेजारी व शाळेच्या स्टेजवर दोन तात्पुरती मतदान केंद्रे उभारली आहेत. ग्रामपंचायतीच्या शेजारी असणारे मतदान केंद्र वरच्या बाजूने वॉटर प्रूफ करण्यात आले आहे.