“आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रिया : दोषींवर कठोर कारवाई होणार
पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गतच्या (आरटीई) 25 टक्के प्रवेश प्रक्रियेत विविध शाळांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे 123 विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा, पालक, अधिकारी यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.
बनावट कागदपत्रे तयार करून पालकांकडून लाखो रुपये उकळून मुलांना “आरटीई’ अंतर्गत प्रवेश मिळवून देणाऱ्या पाच जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात छापा टाकून जेरबंद केले होते. या टोळीकडे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे अनेक शिक्के, लॅपटॉप, रंगीत प्रिंटर सापडले होते. या छाप्यात पोलिसांना विद्यार्थ्यांची व शाळांची यादी आढळून आली आहे. हडपसर पाठोपाठ कोथरूड परिसरातही अशीच टोळी असल्याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदविण्यात आल्या होत्या.
हडपसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एच.टी.कुंभार यांनी पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांच्याकडे अधिक चौकशी करण्यासाठी शाळा व विद्यार्थ्यांची यादी सोपविली आहे. या यादीत हडपसर, कोथरूड, कोंढवा, वानवडी या भागातील नामवंत शाळांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे होते.
पोलिसांनी सखोल चौकशी करण्याबाबत दिलेल्या पत्राची दखल घेत शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी संबंधित 16 शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक, मुख्याध्यापक, महापालिका शिक्षण विभागाचे प्रतिनिधी यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुनावणीचे वेळापत्रक तयार करून प्रत्येकाची सुनावणी घेतली.
त्यांच्याकडून लेखी जबाबही नोंदवून घेण्यात आले आहेत. यात पालकांनी प्रवेशाला किती रक्कम दिली याचीही माहिती नोंदविली आहे.
प्रवेश रद्द करण्याची कारवाई करू
बनावट कागदपत्रांद्वारे प्रवेश घेतल्याच्या प्रकरणी कसून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. यात दोषी आढळणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी दिली आहे.