2019 या वर्षाने या देशाला आणि जगालाही अनेक राजकीय, आर्थिक, सामाजिक धक्के दिले या पार्श्वभूमीवर 2020 कसे असेल याबाबत उत्सुकता आहे. 2020 च्या कॅलेंडरवर नजर टाकली तर हे वर्ष राजकारण आणि क्रीडा या दोन विषयांनीच गाजेल असे दिसते.
नव्या वर्षाच्या नावापासूनच त्यात वेगळेपण दिसत आहे. 1717, 1818, 1919 नंतर आता 2020 हे वर्ष येत आहे. 100 वर्षात एकदाच असे वर्ष येते आणि मनुष्याच्या आयुष्यातही एकदाच असे वर्ष अनुभवता येते. त्यामुळे 2020 या वर्षाची पहाट पाहणारे एका अर्थाने भाग्यवान म्हणावे लागतील. नवीन वर्ष लीप वर्ष असल्याने यावर्षीची संक्रांत 15 जानेवारीला आहे आणि फेब्रुवारीत 29 दिवस आहेत हेही विशेष.
अर्थात त्या जोडीने हे वर्ष राजकारण, मनोरंजन, क्रीडा या सर्वच क्षेत्रात गाजणार आहे. विशेषतः राजकारण गाजवणारे हे वर्ष ठरणार आहे. 2019 या वर्षाने भारताला लोकसभा निवडणुकीचा वेगळा अनुभव दिला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वेगळे राजकारणही पहायला मिळाले. वर्ष संपता संपता झारखंड विधानसभा निवडणुकीने भाजपला आणखी एक धक्का दिला. भाजपची उतरती कळा आणि कॉंग्रेसचा वाढलेला आत्मविश्वास अशा परिस्थितीत भारतीय राजकारण 2020 मध्ये प्रवेश करीत आहे. त्याची कसोटी नवीन वर्षात दिल्ली आणि बिहार या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
नवीन वर्षात लगेचच म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप पुन्हा सत्ता मिळणार का याबाबत उत्सुकता आहे तर भाजप आणि कॉंग्रेस यांची कामगिरी कशी राहील याबाबतही तेवढीच उत्सुकता आहे. त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे. भाजपसाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे. जदयूचे नितीशकुमार भाजपशी युती करणार की नाही याबाबतही सस्पेन्स आहे. बिहारसारखे मोठे राज्य हातातून जाऊ नये म्हणून भाजप निकराचे प्रयत्न करेल तर कॉंग्रेस आणि राजद या पक्षांचे भवितव्यही निवडणूक ठरवणार आहे.
जागतिक पातळीवर विचार करता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग प्रक्रियेची पुढील पायरी नवीन वर्षात पाहायला मिळेल. अर्थात या प्रक्रियेतून ते वाचतील असेच दिसते; पण याच वर्षात अमेरिकेत निवडणूकही होणार आहे त्यामळे अमेरिकन जनता ट्रम्प याना पुन्हा संधी देईल का हे याच वर्षी कळणार आहे. ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन देशाला ब्रेक्झिटच्या विषयाच्या तावडीतून सोडवणार का हे सुद्धा याच वर्षी कळणार आहे.
क्रीडा क्षेत्र गाजणार
2020 हे वर्ष क्रीडा क्षेत्र गाजवणारे वर्ष ठरणार आहे कारण अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा या वर्षात होणार आहेत. दर चार वर्षांनी येणाऱ्या ऑल्मिपिक स्पर्धा यावर्षी जपानची राजधानी टोकियो येथे खेळल्या जातील. 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत तसेच काही महत्त्वाच्या विश्वचषक स्पर्धाही 2020 मध्ये होणार आहेत. 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत अंडर 19 म्हणजेच युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळवली जाईल. 15 ऑगस्ट ते 23 ऑगस्त या काळात महिलांची अंडर 17 बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धा होणार आहे तर तमाम भारतीय क्रिकेट रसिक ज्या स्पर्धंची वाट पाहात असतात ती 2020 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाईल. याशिवाय आयपीएल, विम्बल्डन टेनिस आणि भारतात रणजी क्रिकेट स्पर्धा ठरल्या वेळेला होतील.
मनोरंजन क्षेत्राची उत्सुकता
जगातील सर्वात मोठा चित्रपटनिर्मिती देश असलेल्या भारतात नवीन वर्षात कोणते लक्षणीय चित्रपट प्रदर्शित होतात याबाबत नेहमीच उत्सुकता असते. दरवर्षी सर्व भाषा मिळून भारतात 1 हजार पेक्षा जास्त चित्रपट निर्माण होतात. त्यापैकी ठराविक चित्रपटांचीच प्रदर्शनपूर्व उत्सुकता असते. नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच अजय देवगण याचा “तानाजी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर खूप चर्चा झालेला “धुरळा’ हा मराठी चित्रपटही याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ऍसिड हल्ल्यात जखमी झालेली मोनिका शर्मा हिच्या आयुष्यावर आधारित “छपाक’ हा चित्रपटही आकर्षण ठरणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दीपिका पदुकोनने केली आहे आणि प्रमुख भूमिका तिचीच आहे.
भारताने 1983 मध्ये प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकला होता या कामगिरीवर आधारित “83′ हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होईल. रणवीरसिंगने या चित्रपटात कपिल देवची भूमिका केली आहे. सम्राट पृथ्वीराज चौहानच्या जीवनावर आधारित अक्षयकुमारचा “पृथ्वीराज’ हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात रिलीज होईल. त्याशिवाय “सडक 2′, “बागी 3′, “भूलभुलैया 2′, “सत्यमेव जयते 2′ हे सिक्वेल चित्रपटही रसिकांच्या भेटीस येतील. गोविंदाचा गाजलेला “कुली नंबर 1′ या चित्रपटाचा रिमेक वरुण धवनच्या रूपात प्रदर्शित होईल. जेम्स बॉन्डच्या चित्रपटांचे चाहते असलेल्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी यावर्षी आहे. दीर्घकाळाने जेम्स बॉन्डचा “नो टाइम टू डाय’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे.
डॅनियल क्रेग हाच अभिनेता जेम्स बॉन्डच्या भूमिकेत असणार आहे. हॉरर चित्रपटांचे चाहते असलेल्यांसाठी “ग्रज’ या चित्रपटाचा पुढील भाग यावर्षी प्रदर्शित होणार आहे. मराठीमध्ये “दे धक्का’ चित्रपटाचा दुसरा भाग आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित “पावनखिंड’ हे चित्रपटही आकर्षण ठरणार आहेत. अवकाश तंत्रज्ञानाच्या विषयात यावर्षी नासाची मंगल मोहीम महत्त्वाची आहे. भारताची इस्रो ही संस्था काही उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. एकूणच राजकीय अभ्यासक, क्रीडारसिक आणि चित्रपटवेडे यांच्यासाठी नवीन 2020 वर्ष पर्वणी ठरणार आहे.
मुकुंद फडके