मालमत्तांचा गैरवापर झाल्याचा संरक्षण मंत्रालयाचा दावा
पुणे – देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील जमीन वापरासंदर्भातील माहिती केंद्रीय संरक्षण मंत्रालयाला पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार “लॅन्ड युझ प्लॅन’ अंतर्गत हद्दीतील रहिवासी परिसर, मार्केट परिसर, बंगले, लष्कर परिसर यासंदर्भातील माहिती बोर्डांना केंद्राकडे पाठवावी लागणार आहे.
याबाबत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार म्हणाले की, “देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या हद्दीतील काही मालमत्तांचा गैरवापर झाल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले. काही ठिकाणी रहिवासी परिसर कमर्शिअल (व्यापारीकरण) उद्देशाने वापरल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डांनी आपल्या हद्दीसहीत जमिनीबाबतची माहिती पाठवण्याची सूचना मंत्रालयातर्फे करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इंजिनिअरिंग विभागाने “लॅन्ड युझ प्लॅन’साठीचे कामकाज सुरू केले आहे.’
बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात चर्चा करण्यात येईल. पुढील काही आठवड्यांत हे काम पूर्ण होईल. दि.28 फेब्रुवारीपर्यंत बोर्डाला केंद्राला माहिती पाठवायची आहे. तसेच बोर्डांनी त्यांच्या हद्दीतील इमारतींची उंची आणि बांधकामाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.