श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान अंतर्गत श्रीरामपूर शहरात ० ते ५ वयोगटातील १० हजार ६७५ बालकांना रविवारी पोलिओ डोस पाजण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली. पल्स पोलिओ मोहीम राबविताना श्रीरामपूर शहरात ३४ ठिकाणी बुथ उभारण्यात आले होते.
नगरपरिषद आरोग्य केंद्रासह शहरातील शाळा, अंगणवाडी, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड आदी ठिकाणी बुथद्वारे ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ सकाळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपरिषद श्रीरामपूर येथे झाला. या मोहिमे प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवीना सांगळे, डॉ. संकेत मुंदडा ,श्रीरामपूर रोटरी क्लबचे अध्यक्ष भाग्येश कोठावळे, डॉ.किशोर बधे, अविनाश सलालकर ,उध्दव तांबोळी, डॉ.अजित घोगरे, उल्हास धुमाळ, संदिप शहा, राजेश कुंदे, विनोद पाटणी, अभिजीत मुळे, निकिता कोठवळे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे व उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लब श्रीरामपूरचे अध्यक्ष भाग्येश कोठावळे यांच्या शिवांश व देवांश कोठावळे या जुळ्या मुलांना पोलिओ डोस देऊन मोहिमेचा प्रांरभ करण्यात आला. मोहीमेअंतर्गत रविवारी १०,६७५ बालकांना डोस पाजण्यात आला. पुढील पाच दिवसांत उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन डोस पाजण्यात येणार असून १०० टक्के पल्स पोलिओ मोहीम कार्यक्रम पूर्ण करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी सांगितले.