श्रीरामपूर, (प्रतिनिधी) – येथील एमआयडीसीत शनिवारी (ता.२) मध्यरात्री चोरट्यांनी कारखान्यांच्या सहा कार्यालयांना लक्ष्य केले. यात चार ठिकाणी १ लाख ८७ हजार ५५० रुपयांची रोकड त्यांच्या हाती लागली. चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
शनिवार हा येथील एमआयडीसीचा सुटीचा दिवस असतो. त्यामुळे वर्दळ कमी असते. मात्र, दूध, बेकरी, पशुखाद्य, इलेक्ट्रीकल, फर्निचर यासारखे काही कारखाने सुरू असतात. ही संधी साधत चोरट्यांनी कार्यालयांवर आपले लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले. केशवकुमार काळे यांच्या केशव प्रोसेसरचे कार्यालयाच्या पाठीमागील बाजूकडील जाळी कापून टेबलच्या ड्रावरमध्ये ठेवलेली ९७ हजार ५५० रूपयांची रोकड, अभिजीत कुदळे यांच्या श्री ग्रुप ऑफ इंजस्ट्रीजमधील शटर उचकावून सामानाची उचकापाचक केली.
सागर कुकरेजा यांच्या सूर्या प्लास्टिक इंडस्ट्रीजच्या कार्य़ालयातून १५ हजारांची रोकड, कन्हैया कुकरेजा यांच्या प्राइड बेकर्सच्या कार्य़लयातील ७५ हजारांची रोकड चोरून नेली. सतीष चोरडिया यांच्या चंचल केबल्सची कडी कुलूप तोडून सामानाची उचकापाचक केली. किरण काळे यांच्या अमृत अग्रोवेट कंपनीचे शेडचे शटर उचकटून साहित्याची उचकापाचक केली.
प्रणव जठार यांच्या विद्युत शलाका इलेक्ट्रीक कारखान्यात प्रवेश करताच सुरक्षारक्षकाने पाहिल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. एकूण १ लाख ८७ हजार ५५० रूपयांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली. याप्रकरणी केशवकुमार काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक निरीक्षक देविदास चोपडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.