नवी दिल्ली: निती आयोगाच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याला करोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे निती आयोगाची संपूर्ण इमारत 48 तासांसाठी सील करण्यात आली आहे. निती भवनामधील संचालक पदाच्या श्रेणीच्या एका अधिकाऱ्याला करोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या अधिकाऱ्याची “कोविड-19’ची चाचणी करण्यात आली होती. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास या टेस्टचा रिपोर्ट मिळाला. त्यामध्ये करोनाची लागण झाल्याचे स्पष्त झाले. ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यात आली असल्याचे निती आयोगाचे सल्लागार आलोक कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना घरीच विलगीकरणामध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“आम्ही सर्वजण आवश्यक सूचनांचे पालन करत आहोत आणि आरोग्य मंत्रालयालाही यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. विलगीकरणाशी संबंधित सर्व प्रक्रिया नियमाप्रमाणे पार पाडली जात आहे. संपूर्ण इमारत 48 तासांसाठी निर्जंतुकीकरणासाठी सील करण्यात येत आहे.’ असे कुमार यांनी सांगितले.
अलिकडेच नागरी विमान वाहतुक मंत्रालयाच्या मुख्यालयातील एका कर्मचाऱ्यासही करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे ही इमारतही सील करण्यात आली होती.