बाधितांची संख्या 19 वर दोन सुरक्षा रक्षकांचाही समावेश
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर मध्यावर्ती कारागृहातील आणखी नऊ बंदिजनांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गेल्या 14 दिवसांत या कारागृहातील बाधितांची संख्या 19 वर पोहोचली आहे, अशी माहिती कारागृह अधिक्षक राकेशकुमार भांग्रे यांनी सांगितले.
कारागृहापासून लांब अंतरावर उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहात या पुर्वीच 124 कैद्यांना हलवण्यात आले आहे. करोनासदृश लक्षणे दिसत असल्याने त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यात ते बाधित असल्याचे निष्पन्न झाले. पंधरवड्यापुर्वी आठ कैदी आणि दोन सुरक्षा रक्षकांना करोनाची बाधा झाली होती.
इंदूरच्या चंदननगर भागात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या एका तरूणाला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली होती. त्याला जबलपूर मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. तेथे त्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर इंदूर कारागृहात अटकेत असणाऱ्या त्याच्या वडिलांची चाचणी केली असता तीही पॉझिटिव्ह आली. इंदूर कारागृहात सध्या 2050 कैदी असून कारागृहाची क्षमता 1230 कैदी ठेवण्याची आहे.