कार्ला – “लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने ओळकाईवाडी, कुसगाव परिसरात सशस्त्र “रुट मार्च’ (पोलीस संचलन) करण्यात आले.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकारी ,अठरा पोलीस कर्मचारी, सीआयडीचे एक अधिकारी व पाच कर्मचारी एसआरपीएफचे एक अधिकारी व 12 कर्मचारी व 5 होमगार्ड कर्मचाऱ्यांनी या रुट मार्चमध्ये सहभाग घेतला होता. मावळ तालुक्यात संचारबंदी असून, लोणावळा ग्रामीण भागात काही ठिकाणी कडकडीत पालन होत आहे. तरी काही जण बाहेर पडत आहेत व आता लॉकडाऊनचा अंतिम टप्पा असून, करोना विषाणू अनुशंगाने प्रतिबंधक उपाययोजना व संचारबंदीचे कडेकोट पालन व्हावे, या हेतूने हा रुट मार्च काढण्यात आला होता.
तसेच यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने कुसगाव ओळकाईवाडी व ग्रामीण परिसरातील नागरिकांनी घरातच राहावे, असे आहवान देखील या रुटमार्चमध्ये पोलिसांकडून करण्यात आले.
पथसंचलनात पोलिसांवर फुलांची उधळण
लोणावळा – “करोना’चा संसर्ग रोखण्यासाठी गुरुवारी (दि. 9) पोलिसांनी लोणावळा शहरातून रूट मार्च काढला. या “रुट मार्च’ दरम्यान लोणावळेकर नागरिकांनी ठिकठिकाणी टाळ्या वाजवून आणि फुलांचा वर्षाव करून पोलिसांचे स्वागत केले. करोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी लोणावळा नगरपरिषद आणि लोणावळा शहर पोलीस रात्रंदिवस उपायोजना करीत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून पोलिसांनी हा रूट मार्च काढला. सिद्धार्थ नगर, गावठाण, मावळी पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंद्रायणी पूल, भांगरवाडी या भागातून हा मार्च गेला. या वेळी पोलिसांवर लोकांनी फुलांचा वर्षाव केला, तर लोकांनी टाळ्या वाजून स्वागत केले. शहरचे पोलीस निरीक्षक मनोज यादव, सहायक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका माने व पोलीस कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोब राज्य राखीव दलाची तुकडी व होमगार्ड तसेच नगरपरिषद वॉर्डन देखील या संचलनात सहभागी झाली होते. रूट मार्च दरम्यान, नागरिकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टंसिंगचे भान राखावे अशा सूचना पोलीस खात्याकडून देण्यात येत होत्या.