लहान मुलाचे भांडण ठरले कारण
केडगाव- दापोडी (ता. दौंड) येथे किरकोळ वादातून एकाने चुलत भावाचा खून केल्याची घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी घडली. या प्रकरणी आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश माणिक गायकवाड (वय 32, रा. कलानगर, दापोडी), असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी सतीश व त्याचा चुलत भाऊ सीताराम या दोघांची तीन ते चार वर्षांची लहान मुले एकत्र खेळत होती.
खेळता खेळता त्यांच्यात किरकोळ भांडणे झाली. यावेळी सतीश गायकवाड याने मुलांना तुम्ही भांडणे का करता, असा ओरडला. त्याठिकाणी आरोपी सीताराम गायकवाड आला. तू माझ्या मुलावर ओरडतो काय, आज तुला जीवे मारतो, असे म्हणून लाकडी दांडक्याने सतीश याला मारहाण केली. यानंतर त्यास ओट्यावर ढकलून दिले. यामध्ये सतीश याच्या डोक्याला गंभीर मार लागला.
तो बेशुद्ध पडला. त्याला पत्नी व इतर नातेवाईकांनी यवत येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सतीश गायकवाड याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबतची फिर्याद सतीश गायकवाड याच्या पत्नीने यवत पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी आरोपी सीताराम गायकवाड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.