पोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती

बांधकाम विभागाने दिला नकार : वाहन चालकांमध्ये संताप

दिवे- पुरंदर तालुक्‍यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीला पुन्हा पूर आला आहे. त्यामुळे कऱ्हा नदीवरील नारायणपुरकडे जाणारा पूल पाण्याखाली गेला असल्याने या मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत बंद होती. तर पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. याबाबत पोलिसांनी रस्ते विभागाकडे विचारणा केली असता तो रस्ता आमच्या मालकीचा नसल्याचे सांगून त्याकडे साफ दुर्लक्ष केले. परंतु, वाहतूक सुरू करण्यासाठी सासवड पोलीस आणि होमगार्डनी स्वतः रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरुपात बुजविले.

सासवड-नारायणपूर मार्गावरील कऱ्हा नदीवरील पूल अत्यंत धोकादायक स्थितीत झाला आहे. मागील महिन्यात आलेल्या महापुराने पुलाचे कठडे संपूर्ण तुटून गेले असून, अनेक ठिकाणी रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. वास्तविक पाहता मध्यंतरीच्या काळात तो रस्ता दुरुस्त होणे आवश्‍यक होते. परंतु, रस्ते बांधकाम विभाग आणि राज्य महामार्ग विभाग या दोघांनीही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे रात्री आलेल्या पुराने रस्त्यावरील खड्डे आणखी मोठे झाले. रस्त्यावर पाणी असल्याने दुपारपर्यंत वाहतूक बंद होती. परंतु, पाणी ओसरल्यानंतर वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली. परंतु, खड्डे असल्याने वाहने चालविताना अडचण जाणवीत होती.

दरम्यान, या पुलावरून वाहतूक सुरू असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कामचारी जे. एम. भोसले आणि इतर कर्मचारी तसेच महिला आणि पुरुष होमगार्ड यांनी परिस्थितीचे भान राखत आणि शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतः रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतूक सुरू केली.

यामुळे रस्ते बांधकाम विभाग आणि रस्ते मार्ग विभाग यांचा आडमुठेपणा उघड झाला आहे. वास्तविक पाहता सासवड नगर परिषदेने सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वीच या रस्त्याची मालकी देण्याची मागणी केली आहे. परंतु, रस्ते बांधकाम विभागाने ती नगरपालिकेकडे देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. मात्र, तरीही आपला आडमुठेपणा कायम ठेवत नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरुच ठेवल्याने सर्वच स्तरातून याचा निषेध केला जात आहे.
त्याचप्रमाणे या पुलाची दुरुस्ती करुन पुलाची उंची वाढविणे गरजेचे असून, वेळीच ते झाले नाही तर पूल कोसळून संपूर्ण मार्गाच बंद होण्याचा धोका आहे. त्यामुळे सासवडकर नागरिक आणि वाहनचालक यांनी या पुलाची दुरुस्ती त्वरित करून देण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.