नागपूर : उपराजधानी नागपूर येथील एका फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकून तेथून 4 कोटी 30 लाख रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तीन हवाला व्यापाऱ्यांना अटक केली आहे. रक्कम इतकी मोठी होती की मोजणीसाठी पोलीसांना मशीन मागवावी लागली. या कारवाईनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
गोंदियातील हवाला व्यावसायिक कोट्यवधींची रोकड घेऊन नागपुरात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर नागपूरचे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये छापा घालत. या कारवाईत पोलीसांनी 4 कोटी 30 लाख रुपये जप्त केले आहेत. नेहाल सुरेश वडालिया (वय 38, रा. कोतवाली), वर्धमान विलासभाई पच्चीकार (वय 45) आणि शिवकुमार हरीशचंद दिवानीवाल (वय 45, दोघेही रा. गोंदिया) अशी अटक केलेल्या हवाला व्यापाऱ्यांची नावे आहेत.
पाचशे, दोन हजार आणि इतर मूल्यांच्या नोटांचे बंडल एवढे जास्त होते की मशीनच्या साह्याने नोटा मोजूनही पोलिसांची दमछाक झाली. नोटांचे बंडल पाहून पोलीसही चक्रावून गेले असल्याचे दिसून आले. पुढिल तपास पोलीस करत आहेत.