यवत – पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील केडगाव-चौफुलाजवळ असलेल्या धनश्री लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात लॉज मालकासह तीन आरोपींना अटक केली असून वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 4) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
लॉजचे मालक पियुष धनाजी देशमुख (वय 22, रा. केडगाव, ता. दौंड), कृष्णा संजय गोंगाने (रा. हिंगोली), प्रशांत श्रावण मोहोड (वय 35, रा. चांदुर रेल्वे, जि. अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी आहे की, धनश्री लॉजवर अवैधपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना मिळाली होती. त्यानुसार शर्मा यांनी बारामती क्राइम ब्रॅंचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, बारामती क्राइम ब्रॅंचचे सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संपत खबाले, गणेश पोटे, अश्विनी भोसले यांच्या पथकाने या लॉजवर छापा मारला.
यावेळी आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिला यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असताना आढळून आले. या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, मोबाइल हॅंडसेट, निरोध असा 32 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना महिला सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.