दौंड तालुक्याचे आमदार ऍड. राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
दौंड- आशा सेविकांना सरकारने संरक्षण देऊन त्यांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार ऍड. राहुल कुल यांनी विधानसभेत केली. महाराष्ट्र परिचारिका विधेयक 2020 मध्ये सुधारणा सुचविण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेवेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, जेवढी नर्सिंग कॉलेज आहेत त्यामध्ये ऍडमिशन चांगले प्रकारे होत आहे आणि त्या सगळ्यांना नोकऱ्याही चांगल्या प्रकारे मिळत आहेत. परराज्यातील परिचारिका याठिकाणी येऊन नोकऱ्या करीत असतील तर आपल्या भागातील मुलींना एक चांगली नोकरीची संधी नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते. दहावीनंतर काही करायचे असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. नर्सिंग कॉलेजच्या बाबतीतही प्रोत्साहन देऊन ती कॉलेजची संख्या वाढवण्याच्या संदर्भातील धोरण याठिकाणी आपण हाती घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
आशा वर्कर घटक घराघरांमध्ये जाऊन लोकांपर्यंत पोहोचणारा घटक आहे. सर्वेक्षण संदर्भामध्ये वेगवेगळी कामे करणे, मतदान नोंदणी करणे यावरून वाद होतात आणि अतिशय कमी वेळामध्ये सर्व प्रकारचे सर्वेक्षण करण्याची क्षमता आशा वर्करची आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचे सरकारचे संरक्षण नाही. त्यांना संरक्षण देऊन जर शासकीय सर्वेक्षणाची कामे दिली तर त्यांच्या हाताला काम मिळू शकते आणि त्याचा चांगला उपयोग आपल्या व्यवस्थेमध्ये होऊ शकतो, याचा विचार शासनाने करावा अशा प्रकारची मागणी कुल केली.