पुणे – पती-पत्नीच्या वादातून अन्य दोन व्यक्तींनी पतीची बाजू घेतली. आपण पोलीस आयुक्तांच्या गाडीवर ड्रायव्हर आहोत, असे भासवून पत्नीला ठार मारण्याची धमकी दिली. जनता वसाहतीत हा प्रकार उघडकीस आला.
ललिता विठ्ठल भंडारी (वय 40, रा. जनता वसाहत पर्वती, पुणे) यांनी फिर्याद दिली असून गोपीनाथ वाघ, ज्योतिबा वाघ आणि अनिल काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी आणि गोपीनाथ वाघ हे पती-पत्नी आहेत. फिर्यादी ललिता भंडारी यांनी घर घेण्यासाठी रोख 75 हजार रुपये आणि काही दागिने घरात ठेवले होते. हा ऐवज न सापडल्याने तो गोपीनाथने चोरल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले.
फिर्यादी यांनी गोपीनाथला फोन करून ऐवजाबद्दल विचारले असता, त्याने “दागिने मी चोरून नेले आहे तुला काय करायचे ते कर’ असे सांगितले. तर इतर दोन आरोपींनी फिर्यादी यांना पोलीस आयुक्तांच्या गाडीवर ड्रायव्हर असल्याचे भासवून शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.