प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 -पीएमपी प्रशासनाने रक्षाबंधनानिमित्त आज (दि. 11) 1800 हून अधिक बस मार्गांवर सोडल्या. या सर्व बसना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, गुरूवारी दिवसभर पीएमपी बसमध्ये गर्दी पाहायला मिळाली. पीएमपीला गुरुवारी सकाळच्या सत्रात 90 लाख उत्पन्न मिळाले. रक्षांबधनानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडले होते. त्या तुलनेत पीएमपी बसची संख्या कमी होती.
गुरुवारी 1809 बस मार्गावर धावणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते; पण प्रत्यक्षात यातील बऱ्याच बसचे “ब्रेक डाऊन’ झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. पीएमपी प्रशासनाने जुन्या बस दुरुस्त करून त्या पुन्हा ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. पण यापैकी बऱ्याच बस रस्त्यात मध्येच बंद पडण्याच्या घटना घडल्या.
त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. रक्षांबधनानिमित्त नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. त्यामुळे शहरातील महत्वाच्या बस स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. सुट्टी असल्याने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडले.
लोणावळ्याला जाणाऱ्या बसना गर्दी पाहायला मिळाली. बसला असलेल्या गर्दीमुळे काहींनी रिक्षा आणि खासगी गाड्यांनी प्रवास करण्याकडे कल होता. लहान मुलांना घेऊन गर्दीत प्रवास करण्यापेक्षा ओला आणि उबेरच्या रिक्षा आणि चार चाकी गाड्या बुकिंग करून प्रवास करण्याकडे अनेकांचा कल दिसला.
वाहतूक कोंडीचा पीएमपी वाहतुकीला फटका बसला. बऱ्याच मार्गांवर पीएमपी बस उशिरा धावत असल्याचे निदर्शनास आले.