पुणे – पीएमपीएमएलच्या दहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) देता यावे, यासाठी पीएमपीला महापालिकेने द्यायच्या संचलन तुटीतून उचल देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. याबाबत समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी माहिती दिली.
रासने म्हणाले, पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस देता यावा, यासाठी पुणे महापालिकेच्या हिश्याचे 24 कोटी 31 लाख रुपये द्यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेकडून पीएमपीएमएलला मोफत किंवा सवलतीच्या दराचे बसपास, इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे बसपास यासाठी संचलन तुट रक्कम दिली जाते. मात्र, सानुग्रह अनुदान किंवा बक्षीस वाटपासाठी रक्कम दिली जात नाही. रासने म्हणाले, गेल्या आर्थिक वर्षात पीएमपीने वितरित केलेल्या मोफत किंवा सवलतीच्या दरातील पासेसची रक्कम 3 कोटी 8 लाख रुपये इतकी आहे. या संदर्भात आयुक्तांनी पाठविलेल्या अभिप्रायाचे अवलोकन करून बोनस देण्यासाठी आवश्यक असणारी 21 कोटी रुपयांची उचल देण्यास मान्यता देण्यात आली. ही रक्कम सन 2021-22च्या संचलन तुटीच्या तरतुदीमधून समायोजित करण्यात येणार आहे.
चुकीच्या ठरावामुळे आठवडाभर उशीर
पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा ठराव मागील स्थायी समितीच्या बैठकीतच सभासदांनी दिला होता. त्यानुसार महापालिकेच्या बस पासच्या रकमेतून पीएमपीला बोनसची रक्कम द्यायची होती. मात्र, लॉकडाऊनमुळे ही पासची रक्कम केवळ 3 कोटींची होती. तसेच इतर अर्थशीर्षातून रक्कम देणे शक्य नव्हते. त्यामुळे आज झालेल्या समितीच्या बैठकीत पुन्हा पीएमपीला उचल देण्याचा ठराव मंजूर करत मुख्यसभा मान्यता देईल, या भरवशावर ही रक्कम पीएमपीकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.