पिंपरी – शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभानिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. अंतिम मतदार यादी 1 जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2022 ला 18 वर्ष पूर्ण करणारे नवमतदार हे मतदार यादीत नावनोंदणी करू शकणार आहे.
प्रारुप मतदार यादीनुसार पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात 5 लाख 39 हजार 498 इतके मतदार आहेत. यादीबाबत 30 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती व सूचना देता येणार आहे. 20 डिसेंबरपर्यंत त्याबाबत सुनावणी घेऊन निर्णय घेतला जाईल. https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदार यादी “पीडीएफ’ स्वरुपात भागनिहाय उपलब्ध आहे.
नागरिक त्यामध्ये आपले नाव शोधू शकतात. त्याशिवाय, मतदार नोंदणी कार्यालयातही ही मतदार यादी पाहता येणार आहे. चिंचवड मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी स्मीता झगडे म्हणाल्या की, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राबविला जात आहे. या कालावधीत नागरिकांनी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही हे तपासून घ्यावे. नाव बरोबर नसल्यास त्याबाबतचा अर्ज भरून नावात दुरुस्ती करून घ्यावी. नोव्हेंबर महिन्यात 13 आणि 14 तारखेला तसेच 26 आणि 27 तारखेला मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हजर राहणार आहेत.
तिथे नागरिकांना अर्ज देता येतील. त्याशिवाय, 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही नावनोंदणी करता येणार आहे. स्थलांतरित, मृत आणि दुबार नावे मतदार यादीतून वगळण्यात येत आहे. यापूर्वी 7 हजार 696 मतदारांच्या छायाचित्रांचा मतदार यादीमध्ये समावेश नव्हता. सद्य:स्थितीत 2 हजार 500 मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत समाविष्ट करणे बाकी आहे. चिंचवड विधानसभा मतदार यादीत तब्बल 9 हजार दुबार नावे होती. काही नावे दोन ते तीन वेळा होती. त्यातील एक नाव ठेवून अन्य दुबार नावे वगळण्यात आली आहेत.