पुणे – महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षण मंडळातील शिक्षक, शिक्षकेतर सेवकांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. सन 2020-2021 ते 2024- 25 या पाच आर्थिक वर्षांसाठभ सानुग्रह अनुदान आणि जादा रक्कम मिळण्याबाबत पुणे मनपा कामगार युनियनशी करार करण्यात आला. सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी दोन आठवडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी ही माहिती दिली. याबाबत पक्षनेत्यांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीस विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, उपमहापौर सुनीता वाडेकर, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, कॉंग्रेस गटनेते आबा बागुल, मनसे गटनेते साईनाथ बाबर, एमआयएमच्या गटनेत्या अश्विनी लांडगे, रिपाइंच्या गटनेत्या फरजाना शेख उपस्थित होत्या.
महापौर म्हणाले, “सानुग्रह अनुदानापोटी पुढील पाच वर्षे देण्यात येणारी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ती अनुक्रमे 17 हजार, 19 हजार, 21 हजार, 23 हजार आणि 25 हजार इतकी असणार आहे.
विशेष म्हणजे, करोना काळामध्ये बालवाडी शिक्षिका सेविकांनी दिलेल्या योगदानाची नोंद घेऊन त्या सेवकांना, सर्व शिक्षा अभियानामध्ये काम करणाऱ्या एकूण 66 कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित मनपा सेवकांप्रमाणे सानुग्रह अनुदान पूर्ण देण्यात येणार आहे.
विशेष बाब म्हणून, प्राथमिक शिक्षण विभागाकडील एकूण 96 शिपाई सेवकांना यंदाच्या वर्षी करोना काळातील कामकाजामुळे 174 दिवस भरत असल्याने त्यांना वरीलप्रमाणे सानुग्रह अनुदानाचे फायदे अदा करण्यात येणार आहेत.
करोना काळात मनपा सेवकांनी उत्तम काम केल्याबद्दल बोनस आणि सानुग्रह अनुदानाव्यतिरिक्त बक्षीस म्हणून यावर्षी तीन हजार रुपयांचे विशेष अनुदानही देण्यात येणार आहे.