पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर फ्रान्सची राजधानी पॅरिसला पोहोचले आहेत. या वर्षीच्या बॅस्टिल डे परेड सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे असतील. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. याशिवाय पॅरिसमधील एका कार्यक्रमात ते अनिवासी भारतीयांनाही भेटणार आहेत. ऑर्ली विमानतळावर फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संपूर्ण प्रवास दहा मुद्यांमध्ये जाणून घ्या.
1) पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर राजधानी पॅरिसमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत.
2) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता पंतप्रधान फ्रान्सच्या सिनेटमध्ये पोहोचतील आणि सिनेटचे अध्यक्ष गेरार्ड लार्चर यांची भेट घेतील.
3) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 8.45 वाजता फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्नसह अनेक प्रमुख नेत्यांना भेटतील. यादरम्यान दोन्ही देशांमधील परस्पर संबंधांवर चर्चा होणार आहे.
4) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री 11 वाजता प्रतिष्ठित ला सीन म्युझिकेलमध्ये भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित करतील.
5) भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या खाजगी डिनरला उपस्थित राहण्यासाठी एलिसी पॅलेसमध्ये जातील.
6) शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमधील ऐतिहासिक बॅस्टिल डे परेड सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
7) शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान फ्रान्सकडून 26 राफेल एम नौदल जेट आणि तीन अतिरिक्त स्कॉर्पीन पाणबुड्या खरेदी करण्याचा करार जाहीर होण्याची शक्यता आहे.
8) फ्रेंच संरक्षण सेवांचे अनेक वरिष्ठ अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
9) पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान अनेक संरक्षण करारांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
10) दोन्ही देशांमधील व्यापार आणि आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बैठक घेणार आहेत.
दुसरीकडे, भारत आपली लष्करी यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी फ्रान्सकडून 26 राफेल लढाऊ विमाने आणि तीन स्कॉर्पीन श्रेणीच्या पारंपरिक पाणबुड्या खरेदी करणार आहे. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी त्यास मंजुरी दिली. गुरुवारी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.