उना, (हिमाचल प्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी आज अंब अंदौरा, उना ते नवी दिल्ली या नवीन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी रेल्वेगाडीतील सुविधांचा आढावा घेतला. वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकोमोटिव्ह इंजिनच्या नियंत्रण कक्षाची तसेच उना रेल्वे स्थानकाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूरही उपस्थित होते.
या रेल्वेगाडीमुळे प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. ही देशातली रेल्वे ताफ्यात दाखल होणारी चौथी वंदे भारत ट्रेन असून पूर्वीच्या गाड्यांच्या तुलनेत ही प्रगत आवृत्ती आहे. ही रेल्वे ताशी 100 किलोमीटर वेग फक्त 52 सेकंदात गाठते. हिचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर पर्यंत आहे. प्रत्येक डब्यात 32 इंचाचे स्क्रीन आहेत.
एक्झिक्युटिव्ह डब्यात 180 अंशात फिरणारी अतिरिक्त वैशिष्ट्यपूर्ण आसने आहेत. वंदे भारत एक्सप्रेस 2.0 अनेक उत्कृष्ट सुविधा आणि विमानासारखा प्रवास अनुभव देते. हे प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यात ट्रेनची टक्कर टाळण्याची देशात विकसित केलेली कवच प्रणाली समाविष्ट आहे.