बर्लिन – पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. 2 मे ते 4 मे दरम्यान पंतप्रधान मोदी जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्कला भेट देतील. तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यावर जर्मनीला पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संभाषण करून प्रोत्साहन दिले. जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी चॅन्सलरीमध्ये पोहोचले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर्मन लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पीएम मोदी आणि जर्मन चान्सलर यांच्यात बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या या बैठकीत परस्पर सहकार्य वाढविण्यावरही चर्चा झाली. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिनमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतली.
एका मुलीने पीएम मोदींना तिची एक पेंटिंग दाखवली, त्यावर पीएम मोदींनी ऑटोग्राफही दिला, तर एका मुलाने कविता ऐकवली. पीएम मोदी ही कविता अतिशय लक्षपूर्वक ऐकताना दिसले.
तत्पूर्वी, बर्लिनच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे लोक पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जमले होते. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतही पोहोचले होते.
पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ढोल-ताशांसह भारतीय नागरिक आले होते. लोक गाताना आणि नाचतानाही दिसले. पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी मुलांमध्ये प्रचंड उत्साह होता.