लखनऊ – कल्याणसिंह यांचे यांचे आदर्श आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करू. भगवान श्री राम त्यांच्या दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान देवो, अशा शब्दात पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना श्रध्दांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर उतरल्यानंतर मॉल एव्हेन्यूवरील कल्याणसिंह यांच्या निवासस्थानी गेले. तेथे पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी कल्याणसिंह यांच्या कुटुंबियांचे सांत्व केले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री येथील संजय गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एसजीपीजीआय) निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.
कल्याण सिंह गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना 4 जुलै रोजी गंभीर अवस्थेत अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते जवळजवळ बेशुद्धावस्थेत होते. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आले होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, कल्याणसिंह यांनी आपले नाव सार्थ केले आणि आयुष्यभर लोकांसाठी काम करताना नेहमी लोककल्याणाला प्राधान्य दिले. ते सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्थान बनले. यासोबतच त्यांनी कल्याण सिंह यांच्या आदर्श आणि संकल्पांपासून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात कोणतीही कसर ठेवू नका, असे सांगितले.