PM Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रविवारी त्यांच्या संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसीच्या (Varanasi) दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते एकूण ३७ विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. वाराणसीत त्यांच्या आगमनानंतर, पंतप्रधानांच्या ताफ्यावर लोकांनी विमानतळावरून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला.
वाराणसी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मोदी संध्याकाळी नमो घाटावर काशी तामिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचे लोकार्पण करतील. या कार्यक्रमात ते कन्याकुमारी आणि वाराणसी दरम्यान धावणाऱ्या काशी तामिळ संगम एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. १७ ते ३१ डिसेंबर दरम्यान होणार्या काशी तमिळ संगममध्ये तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील १४०० मान्यवरांचा सहभाग असेल आणि ते वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्याला भेट देतील.
सोमवारी सेवापुरी विकास गटाच्या बर्की ग्रामसभेत मोदी विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात सहभागी होतील.या कार्यक्रमात ते वाराणसी आणि पूर्वांचल प्रदेशात १९ हजार १५५ कोटी रुपयांच्या ३७ प्रकल्पांची पायाभरणी करतील. त्यात रस्ते आणि पूल, आरोग्य आणि शिक्षण, पोलिस कल्याण, स्मार्ट सिटी आणि नागरी विकास प्रकल्प, रेल्वे आणि विमानतळ या प्रकल्पांचा समावेश आहे.