Uddhav Thackeray – तुमचा घराणेशाहीला तर आमचा तुमच्या एकाधिकारशाहीला विरोध आहे, असं म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधानांची तुलना थेट हिटलरशी केली आहे.
स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं पदाधिकारी आणि कार्यकर्ता अधिवेशन आहे, यात बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.
ठाकरे म्हणाले की, निवडणूक जिंकल्यानंतर एखाद्याला संपवण्याची जी पाशवी वृत्ती भाजपकडे आहे, ती चिरडावी लागणार आहे. ज्या पद्धतीने जर्मनीमध्ये एक हिटलर जन्माला आल्यानंतर त्याचा शेवट असा विचित्र झाला की, जर्मनीत पुन्हा हिटलर जन्मालाच आला नाही.
तशा पद्धतीने ही वृत्ती चिरडावी लागेल. विरोधकांना संपवण्याची ही कोणती वृत्ती आहे? तुम्ही तुमच्या मित्रपक्षांना आणि नेत्यांना संपवत आहात. तुम्ही घराणेशाहीवर बोलता.
मी तर सरळ सांगतो, मी घराण्याचा वारसा घेऊन पुढे चाललो आहे. घराणेशाहीत वाईट आहे काय? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थि केला. अधिवेशनात पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान म्हणून नाही, तर भाजपचा नेता म्हणून भाष्य केले.