PM Modi Benjamin Netanyahu Talks: हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर सुरू असलेल्या युद्धादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (10 ऑक्टोबर) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. पीएम मोदींनी सांगितले की, नेतन्याहूंनी फोन केला होता आणि त्यादरम्यान मी त्यांना सांगितले की, कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत.
पीएम मोदींनी सोशल मीडिया X वर पोस्ट करत लिहिले की, “मला फोन करून परिस्थितीबद्दल अपडेट दिल्याबद्दल मी पंतप्रधान नेतन्याहूंचे आभार मानतो.” या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो.”
पीएम मोदींनी म्हटले होते दहशतवादी हल्ला –
पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी शनिवारी (7 ऑक्टोबर) पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या रॉकेट हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हणून संबोधले होते. त्यांनी शनिवारी ट्विटरवर लिहिले की, “इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने धक्का बसला. मृतांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत.”
सध्या काय आहे परिस्थिती ?
असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले वाढवले असून त्याला पूर्णपणे वेढा घातला आहे. गाझामधील आरोग्य मंत्रालयाने सांगितले की इस्रायली हल्ल्यांमध्ये 680 हून अधिक लोक मारले गेले आणि 3,700 हून अधिक जखमी झाले. तर इस्रायलमध्ये 900 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.
इस्त्रायल – हमास युद्धाचे लेटेस्ट अपडेट्स –
– गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की इस्रायलच्या हवाई हल्ल्यात किमान 770 पॅलेस्टिनी ठार आणि 4,000 जखमी झाले आहेत.
-युनायटेड नेशन्सच्या मानवतावादी मदत संस्थेने म्हटले आहे की, गाझा पट्टीमध्ये गेल्या 24 तासांत मोठ्या प्रमाणात विस्थापन वाढले आहे. असे मानले जाते की 187,518 पेक्षा जास्त पॅलेस्टिनी त्यांच्या घरातून पळून गेले आहेत. गाझा पट्टीवर इस्रायलचा गोळीबार सुरूच असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत सुमारे 137,427 विस्थापितांनी 83 शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. 41,000 लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत किंवा नुकसान झाले आहे.
– अमेरिकेने इराणला इस्रायलच्या युद्धात पडू नये, असा इशारा दिला.
-इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 1600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 4500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
– इस्रायली वैद्यकीय सेवेनुसार, शनिवारी दक्षिण इस्रायलवर हमासचा हल्ला सुरू झाल्यापासून इस्रायलमध्ये 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात हमास सैनिक आणि इस्रायली सैन्यादरम्यान ओलिस ठेवलेल्या स्थितीनंतर बिरीमध्ये सापडलेल्या 100 हून अधिक मृतदेहांचा समावेश आहे.
दरम्यान, मध्यपूर्वेतील इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील परिस्थिती पुन्हा एकदा चिघळली आहे. हमास अतिरेक्यांनी शनिवारी (7 ऑक्टोबर 2023) पहाटे गाझा पट्टीवर हल्ला केला. सर्वप्रथम त्यांनी इस्रायलवर 5000 रॉकेट डागले आणि नंतर जमिनीवरून सतत हल्ले करत त्यांनी इस्रायलमध्ये प्रवेश केला.
हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान गाझा आणि वेस्ट बँकमध्ये एकूण 704 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 2,616 लोक जखमी झाले आहेत. तर इस्रायलमध्ये 900 लोकांचा मृत्यू झाला असून 3800 लोक जखमी झाले आहेत. या काळात हमासने शेकडो इस्रायली नागरिकांचे अपहरण केले असून अनेकांची हत्याही केली आहे.
हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान युएईनेही इस्रायलला युद्धात साथ दिली. युएई हा एकमेव इस्लामिक देश आहे ज्याने युद्धात इस्रायलला पाठिंबा दिला आहे. याशिवाय अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि भारत या देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका भाषणात हमासला कडक इशारा देत हे युद्ध इस्रायलने सुरू केले नसून ते आम्ही संपवू, असे सांगितले. त्यांनी हमासची तुलना इसिसशी केली. ते म्हणाले की इस्रायल युद्धात आहे. आम्हाला हे युद्ध नको होते. त्याची सुरुवात अत्यंत क्रूर पद्धतीने झाली. हे युद्ध इस्रायलने सुरू केले नसले तरी इस्रायल ते संपवणार आहे.