पिंपरी – फेरीवाले, हातगाडी, टपरी व स्टॉल धारकांना स्वच्छतेची आवड व्हावी, यासाठी नॅशनल हॉकर्स फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने फेरीवाल्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते म्हणाले की, आपले व्यवसायाचे ठिकाण, आपले शहर पर्यायाने आपले राज्य स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. गेली चार वर्षांपासून शहरात संत गाडगेबाबा स्वच्छ फेरीवाला अभियान सुरु असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला सहकार्य करुन आपला नावलौकिक वाढण्यास फेरीवाल्यांनी सहकार्य करावे. आपण करत असलेला व्यावसाय व अन्न स्वच्छ असावे, याची काळजी घ्यावी. मी स्वच्छता ठेवेन, मी कचरा इतरत्र टाकणार नाही इतरांना करु देणार नाही, मला खात्री आहे की स्वच्छतेकडे नेणारे प्रत्येक पाउल माझ्या राज्याला व देशाला स्वच्छ करण्यास मदत करेल. अशी प्रतिज्ञा या फेरीवाल्यांनी घेतली.
शहरातील सर्व परिसरात हे अभियान होणार आहे, अशी माहिती निमंत्रक किरण साडेकर, प्रकाश साळवे यांनी दिली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, बाळासाहेब बोराडे, वृषाली पाटणे, सहदेव होनमने, लक्ष्मण मेहेर, बशीर रावल, फरिद शेख, अंबालाल सुखवाल, फरिद शेख, विशाल रिटे, अशोक गुप्ता, समाधान मुसळे, सुनिता जाधव, रामा बिरादार आदी उपस्थित होते.