प्लॅस्टिकमुळे वाढतेय पक्ष्यांचे कोलेस्ट्रॉल!

पुणे – जलस्रोतांमध्ये आढळणाऱ्या प्लॅस्टिकमुळे पक्ष्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असून, पक्ष्यांमध्ये विशेषत: किडनीसंदर्भातील आजार आणि कोलेस्ट्रॉल वाढत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात हे प्रमाण गंभीररीत्या वाढले असून, पक्ष्यांसाठी प्लॅस्टिक हे “स्लो पॉयझन’ ठरत आहे. त्यामुळेच जलस्रोतांमधील प्लॅस्टिक कचऱ्याबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज अभ्यासकांकडून व्यक्‍त केली जात आहे.

नदी, तलाव, समुद्र, महासागर यासारख्या जलस्रोतांमध्ये आढळणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याचा पक्ष्यांवर नेमका कात परिणाम होतो? याचा अभ्यास ऑस्ट्रेलिया येथील युनिव्हर्सिटी ऑफ तास्मानिया येथील संशोधकांतर्फे करण्यात आला आहे. नुकतेच यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला असून, या अभ्यासानुसार जगभरातील पक्ष्यांवर प्लॅस्टिक कचऱ्याचे गंभीर दुष्परिणाम होत आहेत. भारतातील पक्ष्यांवरही याचा गंभीर परिणाम होत असून, जलाशयांमधील प्लॅस्टिकमुळे पक्ष्यांना आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे या समस्या इतक्‍या सूक्ष्म असतात की त्यांची लक्षणे दिसून येत नाही. प्लॅस्टिकच्या सेवनामुळे पक्ष्यांमध्ये किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे, वजन कमी होणे, पंखांचा-शेपटाचा आकार छोटा होणे यासारखे बदल घडत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

पक्षी का खातात प्लॅस्टिक?
जलाशयांमधील मासे, बेडूक, वनस्पती आणि इतर जलचर हे पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असते. मात्र, जलाशयांमधील वाढत्या प्रदूषणामुळे पक्ष्यांचे हे खाद्य दुरापस्त होत आहे. तर जलाशयामधील प्लॅस्टिकमधून येणाऱ्या सुगंधामुळे पक्षी त्याकडे आकर्षित होतात आणि प्लॅस्टिक खातात, असे या संशोधनात नमूद केले आहे.

समुद्रातील पक्ष्यांवर सर्वाधिक परिणाम
समुद्रासारख्या विस्तीर्ण जलाशयामध्ये असणारी पर्यटन आणि व्यावसायिक वर्दळ तसेच नद्यांमधून वाहून आलेला कचरा यामुळे समुद्र, महासागर यामध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक असते. परिणामी समुद्रातील जीवसृष्टी हे प्रमुख खाद्य असणाऱ्या समुद्री पक्ष्यांच्या आरोग्यावर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे. अभ्यासानुसार, गेल्या 30 वर्षांत प्लॅस्टिकच्या दुष्परिणामामुळे प्रभावित झालेल्या पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या झपाट्याने वाढत असून, 1995 साली 263 इतकी असलेली ही संख्या आज 2249 इतकी झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)