कोल्हापूर – गेल्या 10 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पर्यंत 51 हजार पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अद्याप देखील कोल्हापूरच्या पंचगंगेच्या महापुराची स्थिती कायम आहे. अशातच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा असंवेदनशील व्हिडीओ समोर आला आहे.
हा व्हिडीओ कोल्हापुरमधील असून गिरीश महाजन पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बोटीत बसून पुराची पाहणी करताना दिसत आहेत. यावेळी एक व्यक्ती हातात मोबाइल घेऊन सेल्फी व्हिडीओ काढताना दिसत आहे. या व्हिडीओत आपण फ्रेममध्ये आल्यानंतर गिरीश महाजन हसत हात हलवताना दिसत आहे. पुराच्या ठिकाणी अशा पद्धतीने हसून दाद दिल्याने गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
जनता पुराने त्रस्त अन् गिरीश महाजन सेल्फी व्हिडीओत दंग#म #मराठी #Girishmahajan #maharashtrafloods #MaharashtraRains #MaharashtraFlood #viralvideo pic.twitter.com/hsNUKtTmbg
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) August 9, 2019
दरम्यान, यावर टीका करताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल विचारत मुख्यमंत्री या असंवेदनशील वागण्याची दखल घेणार का? अशी विचारणाही केली आहे.