थेरगाव रुग्णालयात होणार कर्करोगावर उपचार

भोसरी रुग्णालय 15 ऑगस्ट पासून खुले 

पिंपरी – कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर गोरगरिबांनाही उपचार मिळावेत म्हणून यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालयात कर्करोगावर उपचार देण्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विचाराधीन आहे. याबाबत टाटा ट्रस्ट आणि पिंपरी महापालिका प्रशासनामध्ये चर्चा सुरू आहे.

यासंदर्भात महापालिका भवनात आज (गुरुवारी) आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये महापालिकेच्या नव्याने उभारलेल्या तसेच विकसित करण्यात येत असलेल्या पाच रुग्णालयांबाबत चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने कर्करुग्णालयाचा मुद्दा चर्चिला गेला.

याबाबत अधिक माहिती देताना विलास मडिगेरी म्हणाले की, शहरात एकही कर्करुग्णालय नाही. महापालिकेच्या रुग्णालयांमध्येही तशी सुविधा नसल्याने गोरगरीब रुग्णांची ससेहोलपट होत आहे. अशा रूग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील टाटा कर्क रुग्णालयाच्या धर्तीवर पिंपरी महापालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालय विकसित करण्याबाबत चर्चा झाली. टाटा ट्रस्टने हे रुग्णालय चालविण्याची तयारी दर्शविली आहे. हे रुग्णालय दोनशे खाटांचे असेल. टाटा मेमोरियल रुग्णालयात मिळणाऱ्या सर्व सुविधा याठिकाणी उपलब्ध असतील. यामुळे या शहरातील रुग्णांवर इथेच उपचार शक्‍य होतील. हे रुग्णालय चालविण्यासाठी टाटा कंपनीने “सीएसआर’ अंतर्गत मदतीची तयारी दर्शविली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने नव्याने उभारलेले भोसरी येथील रुग्णालय गेली अनेक वर्षे धूळखात आहे. एका आमदाराच्या हट्टाखातर खासगी तत्वावर चालविण्यास देण्याचा घाट प्रशासनाने घातला होता. मात्र, त्यास तीव्र विरोध झाला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने एक पाऊल मागे घेत हे रुग्णालय अखेर खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 ऑगस्टपासून बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.