मुंबईकर तबलिगीला मिळाला पहिला मान
मुंबई : दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या मरकसनंतर तबलिगी जमातमुळे देशात मोठ्या प्रमाणात करोना विषाणूचा पसरल्याचा आरोप झाला. मात्र, आता त्याच तबलिगी जमातचा एक व्यक्ती करोनाविरुद्धच्या लढाईत वापरण्यात येणाऱ्या प्लाझ्मा थेरपीचा पहिला डोनर ठरला आहे. तबलिगीचे कार्यकर्ते अब्दुर रहमान हे पहिले प्लाझ्मा डोनेट करणारे डोनर ठरले आहेत.
अब्दूर रहमान हे दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील रहिवाशी आहेत. दिल्ली येथील मरकस कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. मुंबईत आल्यानंतर त्यांच्यात करोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना 21 मार्चला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ते करोनातून उपचाराने बरे झाले. त्यामुळे 31 मार्चला त्यांना डिस्चार्ज करण्यात आले.
मुंबईत करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. करोना हा प्लाझ्मा थेरेपीने बरा होऊ शकतो, हे सिद्ध झाल्याने आता करोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा उपचार सुरु करण्यात आला आहे. प्लाझ्मा थेरेपीसाठी करोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा वापरला जातो. कारण, जे रुग्ण करोनातून बरे झालेत त्यांच्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम प्लाझ्मा करते. त्यामुळे आता करोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा गोळा करण्याचं काम सध्या सुरु आहे. करोनामुक्त झालेले अब्दुर रहमान यांना प्राधान्याने प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी प्लाझ्मा डोनेट करण्यास होकार दर्शविला.