यांत्रिकीकरणाद्वारे होणार भात लागवड

300 एकर क्षेत्रावर केली जाणार लागवड : शेतकऱ्यांनी घेतला निर्णय

पुणे – पावसाळा सुरू होताच भातशेतीच्या कामाला सुरुवात होते. मात्र, भात लागवडीच्या वेळी मनुष्यबळ कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे यावर्षीही यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून 300 एकर क्षेत्रावर ही लागवड केली जाणार आहे.

मागील तीन वर्षांपासून यांत्रिकीकरणाचा प्रयोग यशस्वी होत असल्यामुळे यंदाही हा प्रयोग राबविणार आहे. त्यामुळे भात पिकांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिमपट्टयात खरिपातील प्रमुख पीक म्हणून भात घेतले जाते. भात लागवडीमध्ये मजुरीवरील खर्च अधिक आहे. शिवाय प्रत्यक्ष भात लागवडीच्यावेळी मजुरांची कमतरता भासते. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी आत्मा योजनेअंतर्गत 2015-16 मध्ये नावीन्यपूर्ण बाबीखाली बारामती कृषी विज्ञान केंद्र यांना एक स्वयंचलित भात लावणी यंत्र शंभर टक्‍के अनुदानावर देण्यात आले होते. 2016-17 मध्ये भात तालुक्‍यातील नाटंबी येथे दोन शेतकऱ्यांच्या शेतावर यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. त्यानंतर 2017-18 मध्ये भोर, वेल्हा, मावळ आणि मुळशी या तालुक्‍यामध्ये 77 एकर क्षेत्रावर यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीची यशस्वी पीक प्रात्यक्षिके घेण्यात आली होती. या कार्यक्रमाची उपयुक्तता पाहून गेल्या 2018-19 मध्ये भातपट्यातील 160 शेतकऱ्यांनी 155 एकरावर भात प्रात्यक्षिके घेण्यात आली होती. त्यामुळे या यांत्रिकीकरणाचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. सध्या भात पट्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, आंबेगाव, जुन्नर या भात पट्यातील शेतकऱ्यांनी रोपवाटिकीची कामे वेगाने हाती घेतली आहे. काही शेतकऱ्यांनी भाताच्या बियाणांची उगवणक्षमता तपासून पाहण्याचे कामे हाती घेतली आहे. तर अनेक ठिकाणी रोपवाटिका तयार करण्याचे कामे सुरू झाली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका तयार करून, त्यात बियाणे टाकण्यास सुरूवात केली आहे.

यांत्रिकीकरणाचे महत्त्व पटले
जिल्ह्यात विविध भागांमध्ये मागील तीन वर्षांपासून यांत्रिकीकरणाचा प्रयोग यशस्वी होत आहे. तसेच यांत्रिकीकरणाचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये वाढत असून यांत्रिक शेती पद्धतीचा वापर केल्यामुळे वेळ व पैशांची बचत होते आणि मनुष्यबळ कमी लागले, हे शेतकऱ्यांना कळू लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.