दिघीतील पाणी समस्येवरून आमदारांचा त्रागा

भोसरीत बैठक : ढिसाळ नियोजनाचा प्रशासनावर आरोप
प्रलंबित कामांची सादर केली जंत्री

भोसरी – एक दिवसाआड पाणी पुरवठा करून देखील नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. दिघी परिसरात चार-चार दिवस पाणी येत नाही. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, असा त्रागा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला. भोसरीत मतदार संघातील प्रलंबित प्रश्‍न आणि चालू असलेल्या विकासकामांचा आमदार लांडगे यांनी आढावा घेतला. त्यात त्यांनी पाणी पुरवठा विभागावर नाराजीचा सूर आळवला.

महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, विद्युत विभागाचे प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, संजय कुलकर्णी, नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक राजेंद्र पवार, वायसीएमचचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, नितीन बोऱ्हाडे बैठकीला उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले, बोऱ्हाडेवाडीत पाण्याची टाकी बांधावी. नागरिकांना टीपी स्कीमची माहिती द्यावी. बोऱ्हाडेवाडीतील शाळेत पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करुन द्यावेत. चिखलीतील प्राथमिक आरोग्य केंद्र विकसित करावे. नदी प्रदूषण आणि भंगार व्यावसायिक कचरा जाळत असल्याने धुराचे प्रमाण वाढत आहे. त्यावर कायमचा तोडगा काढावा. चऱ्होलीतील आरक्षित जागेवर समाज मंदिर बांधण्यात यावे. गव्हाणे वस्तीतील रस्त्याचे डांबरीकरण करावे. भोसरी गावठाणातील भूमिगत जलनिस्सारणची कामे पुर्ण करावीत. गायरान जमिनीबाबत हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु करावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आळंदी रोड, शास्त्री चौक ते चक्रपाणी वसाहत येथील 30 मीटर रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्याच्या मागचा पुढचा रस्ता झाला आहे. परंतु, 30 मीटर रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यावरुन 30 हजारहून अधिक नागरिक ये-जा करतात. हा रस्ता रेडझोनमध्ये असला तरी त्यावर तोडगा काढावा आणि रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशा सूचना आमदार लांडगे यांनी केली. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक राजेंद्र पवार यांना या रस्त्याबाबत तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत.

भोसरीतील प्रलंबित विकासकामांची आमदार महेश लांडगे यांनी यावेळी जंत्रीच सादर केली. चिखलीतील जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे काम हाती घ्यावे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला चालना द्यावी. समाविष्ट गावात टीपी स्कीमनुसार विकासकामे करावीत. 24 तास पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी. पाणी पुरवठा सुरळीत करावा. भोसरीतील रुग्णालयात ओपीडी सुरू करावी. विकास आराखड्यातील रस्ते, उद्यानाची कामे मार्गी लावावीत, अशा सूचना आमदार लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.