बीड – भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधु व राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, अशी टीका करणाऱ्या धनंजय मुंडे यांनीच बाबासाहेबांनी दिलेल्या ऍट्रॉसिटीचा गैरवापर केला, खोटी ऍट्रॉसिटी लावली, यापुढे बीड जिल्ह्यात असे प्रकार चालणार नाहीत, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
केज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी डॉ. बाबासाहेबांचा अपमान केलाय, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्याला आज पंकजा मुंडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
केज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करत म्हटले होते की, सर्वोत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद 32 व्या क्रमांकावर आहे. मी मंत्रीपदी असताना पहिल्या चार मंत्र्यांमध्ये माझे नाव होते. 32 व्या नंबरपर्यंत आम्ही कधीही घसरलो नाहीत, अशी खोचक टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. मात्र याला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले होते की, पंकजा मुंडे यांनी माझी औकात काढली. माझे मंत्रीपद काढले. हा माझा नव्हे तर माझ्या खात्याचा म्हणजेच सामाजिक न्याय विभागाचा आणि पर्यायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे.
धनंजय मुंडे यांच्या या टीकेला उत्तर देतानाच पंकजा मुंडे यांनी आज त्यांच्यावर घणाघात केला. त्या म्हणाल्या, भाषण करताना बीड जिल्ह्याला पहिल्या चारात होते असे म्हणाले. तुमचा नंबर 32 वा आहे. जे आहे ते बोललो. आम्ही काही खिजवले नाही. मी 32 वा नंबर म्हटले. मी औकात म्हटले नाही. तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून पहा असा सल्लाही त्यांनी दिला.