वाई -समाजाभिमुख कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सोनजाई मंदिर देवस्थानकडून सोनजाई डोंगरावर विविध प्रकारच्या दुर्मिळ जातीच्या 50 वृक्षांचे रोपण करण्यात आले. विशेष म्हणजे सोनजाई मंदिराचे ट्रस्टी मंगलगिरी महाराज यांनी नेपाळहून मागविलेल्या रुद्राक्ष जातीच्या झाडाचेही यावेळी विधीपत पूजा करुन रोपण करण्यात आले आहे.
सोनजाई डोंगरावर देवस्थानच्यावतीने दरवर्षी विविध जातीच्या झाडांचे वृक्षारोपण केले जाते. तसेच त्याचे योग्य संगोपनही करण्यात येते. सोनजाई देवीच्या मंदिर परिसरात देवस्थानच्यावतीने चालत आलेल्या रूढी व परंपरा यांचा योग्य समन्वय साधून समाजाभिमुख कार्यक्रम हाती घेण्यात येतात. उंच डोंगरावर उजाड माळावर देवस्थानने वड, लिंब, शेवगा, आंबा, चिंच, जांभळी यासारखी उपयोगी असणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण करून डोंगरावर हिरवाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
सोनजाई डोंगरावर देवस्थानच्यावतीने अनेक प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात येतात. त्यातीलच रुद्राक्षाचे झाड लावण्याचा हा एक आगळा वेगळा प्रयत्न देवस्थानाने केला आहे. हे झाडही चांगल्या पद्धतीने वाढवू, असा विश्वास मंगल गिरी महाराजांनी व्यक्त केला. फळझाडांच्या रुक्षारोपण कार्यक्रमास वाई अर्बन बॅंकेचे संचालक प्रा. विष्णूपंत खरे, बांधकाम अधिकारी रामदास राऊत, सोनजाई देवस्थानाचे ट्रस्टी मंगलगिरी महाराज, तुकाराम गिरी महाराज, बळीराम कट्टे, महेश पिसाळ, प्रा. आनंद घोरपडे, तानाजी निंबाळकर, हेमंत खरे, प्रणीत सुतार, धनंजय कारळे, चंद्रकांत गोळे, प्रा. धनंजय निंबाळकर, माधव माने, विठ्ठल गिरी, यांच्या बावधन परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होते.