वाई – पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली होती. या महाविद्यालयासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा आरक्षित करण्यात आली आहे. ही जागा महामंडळाकडून शासनाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
खंडाळा येथे विराज शिंदे यांच्या पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये कॉंग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक अमित देशमुख यांनी नुकतीच घेतली. त्यावेळी याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्यावतीने युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे व पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना दिले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण व रुग्णांना आरोग्य सेवासुविधा मिळण्यासाठी या महाविद्यालयाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे, किसनवीर साखर कारखान्याचे संचालक रतनसिंह शिंदे, गुरूदेव बरदाडे, वाईचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार खामकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, अशोक धायगुडे, युवराज ढमाळ, शैलेश गाढवे, प्रमोद अनपट, यशवंत चव्हाण, संदीप साळुंखे, अतुल पवार, मनोज पवार, हर्षवर्धन भोसले, रवींद्र ढमाळ, जितेंद्र खंडागळे, बंटी बरदाडे, सचिन वायदंडे, रमेश शिंदे उपस्थित होते. या महाविद्यालयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण मिळेल. या महाविद्यालयाचे काम लवकरात लवकर सुरू करून आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करू. अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.